esakal | मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवराजसिंहांनी घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Singh Chauhan

भाजप आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत शिवराजसिंह यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर चौहान यांनी बहुमताचा दावा करत आज राज्यपालांकडून शपथ घेतली. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवराजसिंहांनी घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेत कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळे भोपाळ आणि जबलपूर जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. तर, ज्योतिरादित्य शिंदे यांनी मी कायम शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत उभा असल्याचे म्हटले आहे.

मध्य प्रदेशमध्ये अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने पुन्हा आपले सरकार स्थापन करण्यात यश मिळवले आहे. तीन वेळेस राज्याचे नेतृत्व केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांना आज रात्री नऊ वाजता राजभवन येथे राज्यपाल लालजी टंडन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. चौहान हे चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. 

काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे आणि नाट्यमय घडामोडींनंतर आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच २० मार्चला राजीनामा दिल्यामुळे सरकार कोसळले. आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडे बहुमत असल्याने भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले होते. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ ९२ वर आले. दुसरीकडे भाजपने १०७ आमदारांच्या जोरावर राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. 

भाजप आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत शिवराजसिंह यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर चौहान यांनी बहुमताचा दावा करत आज राज्यपालांकडून शपथ घेतली. 

शिवराजसिंह चौहान यांनी २००३ ते २०१८ अशी सलग १५ वर्षे राज्याचे नेतृत्व केले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीत निसटता पराभव झाल्यानंतर राज्यात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, गेल्या वर्षभरात भाजपचे सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरुच होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

loading image