नदीत पिंजऱयासह बेपत्ता झालेल्या जादूगाराचा मृत्यू

वृत्तसंस्था
Tuesday, 18 June 2019

पिंजऱयात 36 कुलूपांनी बंदिस्त होऊन स्वतःला गंगा नदीत झोकून दिल्यानंतर बेपत्ता झालेल्या जादूगाराचा मृत्यू झाला आहे.

कोलकाता : पिंजऱयात 36 कुलूपांनी बंदिस्त होऊन स्वतःला गंगा नदीत झोकून दिल्यानंतर बेपत्ता झालेल्या जादूगाराचा मृत्यू झाला आहे. चंचल लाहिरी (वय 40) असे या जादूगाराचे नाव असून, ते जादूगार मॅंड्रेक या नावाने प्रसिद्ध आहेत. लाहिरी यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

लाहिरी यांनी स्वतःचे हातपाय बांधून 36 कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यात कोंडून घेत गंगा नदीत झोकून दिले होते. कुटुंबीय, पोलिस आणि प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी हा स्टंट त्यांनी केला होता. स्टीलच्या पिंजऱ्यात 30 फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी हा स्टंट केला होता. ते सहा सेकंदांनी पाण्यावर आलेही. त्याचवेळी चाहत्यांनी जादूगार मॅंड्रेक यांनी ही जादू कशी केली, हे आपण सांगू शकतो, असा दावा केला होता. स्टंट सुरु झाल्यानंतर बराच वेळ होऊनही लाहिरी बाहेर आले नव्हते. त्यामुळे गोंधळ उडाला होता. काही नागरिकांनी आपण नदीच्या मध्यभागी एका व्यक्तीला मदतीसाठी झगडत असल्याचे पाहिले आहे, असा दावा केला होता. पोलिसांना माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.

तत्पूर्वी, 'मी स्वतःला मोकळं करु शकलो, तर ती जादू असेल, अन्यथा ती शोकांतिका ठरेल' अशी प्रतिक्रिया त्यांनी हा स्टंट करण्यापूर्वी दिली होती. याच ठिकाणी 21 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अशाच प्रकारचा स्टंट आपण केल्याचंही त्यांनी सांगितले होते. 'मी एका बुलेटप्रूफ काचेच्या बॉक्‍समध्ये होतो. साखळ्यांनी स्वतःला कुलूपबंद करुन घेतले होते. हावडा ब्रिजवरुन मला खाली सोडण्यात आले. मी 29 सेकंदांच्या आत बाहेर आलो होतो' अशी माहिती जादूगार मॅंड्रेक यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. यावेळी स्वतःला सोडवणे अधिक कठीण असेल, असेही ते म्हणाले होते. 2013 मध्येही लाहिरी यांनी हा स्टंट केला होता, मात्र, बघ्यांनी हुल्लडबाजी केली होती. बॉक्‍सच्या दरवाजातून त्यांना बाहेर पडताना पाहिल्यानंतर बघ्यांनी त्यांना त्रास दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: magician chanchal lahiri wizard mandrake dead kolkata hooghly river