देशातील पाणथळ क्षेत्रांत ६.५ लाख हेक्टरने वाढ

दशकातील वाढीत महाराष्ट्र पहिल्या स्थानी
Maharashtra in first place Increase in wetland area of country six and a half lakh hectares
Maharashtra in first place Increase in wetland area of country six and a half lakh hectaressakal

औरंगाबाद : देशातील पाणथळ क्षेत्रांत २००७-२०१७ या दहा वर्षांत तब्बल ६ लाख ४१ हजार ६८२ हेक्टर इतकी वाढ झाली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरचा अहवाल (स्पेस बेस ऑब्जर्व्हेशन ऑफ इंडियन वेटलॅण्ड्स) नुकताच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. यातून ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्राची दशकातील वाढ ही एकूण १ लाख ७० हजार ५ हेक्टर इतकी आहे. दशकातील वाढीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

पाणथळ क्षेत्रांचे मानवी विकासासह पर्यावरण संतुलनात मोठे योगदान आहे. वाढती लोकसंख्या आणि विकासकामांचा परिणाम या क्षेत्रावरही होत आहे. परिणामी या क्षेत्राचे संवर्धन आणि व्यवस्थापन यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरने (एसएसी) पाणथळांचा अद्ययावत डेटा (डिकेडल चेंज ॲटलास) उपलब्ध करून दिला आहे. देशातील पाणथळांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यासाठी त्यांचे पद्धतशीर संनियंत्रण आणि शास्त्रशुद्ध आरेखन होण्यासाठी याची यंत्रणेला मोठी मदत होणार आहे. देशातील पाणथळांबाबत पहिल्या अहवालात वर्ष २००६-२००७ पर्यंतच्या नोंदी घेण्यात आल्याहोत्या. यानंतर आता २०१७-१८ पर्यंतची पाणथळांची ‘अंतराळाधारित निरीक्षणे’ एसएसीकडून नोंदविण्यात आलेली आहेत.

एकूण पाणथळ क्षेत्रात गुजरात पहिल्या स्थानावर (३४ लाख ९९ हजार ४२९ हे.) असून महाराष्ट्र दुसऱ्या (११ लाख ५२ हजार ६२५ हेक्टर) स्थानी आहे. अंतर्गत आणि किनारी असे पाणथळांचे दोन प्रकार पडतात. देशांतर्गत व किनारी प्रकारात नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे प्रत्येकी दोन गट आहेत. महाराष्ट्रातील दशकीय सर्वाधिक वाढ (२००७-२०१८) ही अंतर्गत प्रकारात (१ लाख ६२ हजार ११४ हेक्टर) झालेली आहे. गुजरात राज्य पाणथळाच्या एकूण क्षेत्रात देशात पहिल्या स्थानी असला तरी दशकीय बदलात महाराष्ट्राने त्याला मागे टाकले आहे. गुजरातची दशकीय वाढ ५० हजार १६ हेक्टर तर महाराष्ट्राची ही वाढ एकूण १ लाख ७० हजार हेक्टर इतकी आहे. विशेष म्हणजे दशकीय बदलातील वाढीत महाराष्ट्राने सर्वच राज्यांना मागे टाकले आहे.

सागर किनारे, धरणे, तलाव, मिठागरे, नदीपात्र, कांदळवन आदी घटकांतून पाणथळ क्षेत्र तयार होते. अहवालात २०१७-२०१८ पर्यंत देशातील या घटकांची संख्या दोन लाख ३१ हजार १९५ इतकी नोंदविण्यात आलेली आहे. तर देशाचे एकूण पाणथळ क्षेत्र १ कोटी ५९ लाख ८१ हजार ५१६ हेक्टर इतके नोंद झाले आहे. जे वर्ष २००६-०७ पर्यंत १ कोटी ५३ लाख ३९ हजार ८३४ इतके होते. म्हणजेच तब्बल ६ लाख ४१ हजार ६८२ हेक्टर इतकी वाढ झालेली आहे. महाराष्ट्राचे एकूण पाणथळ क्षेत्र ११ लाख ५२ हजार ६२५ हेक्टर इतके नोंद झाले असून ते २००६-०७ पर्यंत ते ९ लाख ८२ हजार ६२० हेक्टर इतके होते.

स्वतंत्ररीत्या देशात नव्याने वाढलेले एकूण क्षेत्र तीन लाख ६१ हजार ६६७ हेक्टर इतके आहे. यातही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर (८२ हजार ७११ हेक्टर) आहे. देशाचे एकूण पाणथळ क्षेत्र १ कोटी ५९ लाख ८१ हजार ५१६ हेक्टर नोंद झाले आहे.

राज्यनिहाय पाणथळांचे एकूण क्षेत्रफळ (हे.)

  • गुजरात ३४,९९,४२९

  • महाराष्ट्र ११,५२,६२५

  • उत्तरप्रदेश ११,०४,५६२

  • पश्चिम बंगाल ११,३०,१२७

  • आंध्रप्रदेश ११,४१,६०६

पर्यावरण, जैवविविधतेसह जल आणि अन्नसुरक्षेसाठी देशातील पाणथळांचे महत्त्व खूप मोठे आहे. पाणथळ क्षेत्रात वाढ होणे सकारात्मक बाब आहे.

- डॉ. सत्यसेलवम, सहायक संचालक, वेटलॅण्ड प्रोग्रॅम, बीएनएचएस, तामिळनाडू

-जितेंद्र विसपुते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com