esakal | "महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांनी देशाची चिंता वाढवली"
sakal

बोलून बातमी शोधा

"महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांनी देशाची चिंता वाढवली"

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबात चिंता व्यक्त केली

"महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांनी देशाची चिंता वाढवली"

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

देशातील काही राज्यांत वेगानं वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबात चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात सध्या एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यावर आरोग्य मंत्रालय विशेष लक्ष ठेवून आहे. या राज्यासोबत मंत्रायलानं आतापर्यंत तीन बैठका केल्या असून कोरोना नियंत्रणावर भर देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.  

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल म्हणाले की, महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णावरुन असं स्पष्ट होतेय की,  कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा बाळगू नये. तसेच  कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करायलाच हवं.

ICMR चे संचालक बलराम भार्गव यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात खराब अवस्था आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. याचं कारण म्हणजे, कोरोना चाचण्या कमी झाल्या आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाच्या निमांची पायमल्ली करत आहेत. लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा विळखा वाढत आहे.' यावेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की प्रत्येक राज्यात कोरोना लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास ८६ टक्के रुग्ण या सहा राज्यातील आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २२ हजार ८५४ रुग्ण आढळले. यापैकी तब्बल ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १३ हजार ६५ कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर केरळ (२४५७) आणि पंजाब (१,३९३) कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. 

या ८ राज्यात वाढतेय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या - 
महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतं असल्याचे आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. केरळमध्ये या संख्येत घट होत असली तरीही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.   

loading image