आज राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी सुरु असून त्यातच राऊतांनी भाजप आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत.
Breaking News
Breaking News Sakal

ज्याला वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायची असेल तो मारू शकतो - आदित्य ठाकरे

सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सक्रिय सदस्य नसून त्यांचे वडील सुभाष देसाई गेली अनेक वर्षे आमच्यासोबत आहेत. ज्याला वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायची असेल तो उडी मारू शकतो . भूषण देसाई यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल परबांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

शिवसेना (उद्धव बी ठाकरे) नेते अनिल परब यांनी दापोली रिसॉर्ट प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय ईसीआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. जे रेवती डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचे मान्य केले.

CM शिंदेंच्या उपस्थितीत सुभाष देसांईंचे पुत्र शिवसेनेत

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ देसाई कुटुंबात देखील फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

 मुंबईच्या मलाड पूर्वेतील झोपडपट्टीत भीषण आग

मुंबईच्या मलाड पूर्वेतील आप्पा पाडा आनंदनगर परिसरातील झोपडपट्टीत भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

  ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात जाणार

मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीय असणारे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे ते आदित्य ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेले सुभाष देसाई यांच्या घरातच फूट पडल्याचं दिसून येत आहे. कारण त्यांचे पुत्र भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी असा निर्णय का घेतला याबद्दल भुषण देसाईच खुलासा करण्याची शक्यता आहे.

 काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी गिरगावात थांबवला

नाना पटोले यांच्या नेतृत्वात सुरू असलेला काँग्रेसचा मोर्चा गिरगाव चौपाटीजवळ आडवण्यात आला आहे. याठिकाणी पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली आहे.

काँग्रेसचा विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजभवनावर भव्य मोर्चा

शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचा राजभवनावर मोर्चा काढण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले, भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पिकविमासंबंधीत मागणा्या तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशा अनेक मागण्या काँग्रेसकडून करण्यात येत आहेत.

पोहरादेवी संस्थानचे महंत मातोश्रीवर

पोहरादेवी संस्थानचे महंत सुनिल महाराज हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

समलिंगी विवाहाचा मुद्दा आता सुप्रिम कोर्टात

सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाच्या मुद्द्याला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भातील याचिका घटनापीठासमोर सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

मी शिवसेनेत नाराज नाही - वैभव नाईक

माझा शिंदे गटात जाण्याचा कुठलाच विचार नाही, असं स्पष्ट मत वैभव नाईक यांनी व्यक्त केलं. राणे यांचं मंत्रीपद जाणार या विधानानंतर भाजपनं हा प्रचार सुरू केला. मी नाराज नाही, पक्षाला जेव्हा केव्हा गरज असेल, मी काम करत राहीन. त्यांची इच्छा आहे की मी त्यांच्या सोबत जावं, असंही नाईक म्हणाले.

मुंबईतील फर्निचर मार्केटला लागलेली आगीत 20 ते 25 दुकानं जळून खाक

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला लागलेली आगीत 20 ते 25 फर्निचरची दुकानं जळून खाक झाली.

रामचंद्र पौडेल यांनी घेतली नेपाळचे राष्ट्रपती म्हणून शपथ

रामचंद्र पौडेल (Ram Chandra Paudel) यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनात नेपाळचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीये. राष्ट्रपती भवनात नेपाळचे कार्यवाहक सरन्यायाधीश यांनी त्यांना शपथ दिली. पौडेल यांचा सामना सीपीएन-यूएमएलचे सुभाषचंद्र नेमवांग यांच्याशी होता. या निवडणुकीत रामचंद्र पौडेल यांना 33,802 मतं मिळाली. आयोगानं सांगितलं की, नेपाळी संसदेत झालेल्या निवडणुकीत फेडरल संसदेच्या 313 सदस्यांनी भाग घेतला.

दहावीचे पेपर अवघड जात असल्यामुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

मरवडे : दहावीचे पेपर अवघड जात असल्यामुळे एका शाळकरी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मरवडे (ता. मंगळवेढा) येथे रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मरवडे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवसात पाच कोरोनाबाधित आढळले

कोल्हापूर जिल्ह्यात तीन महिन्यांनी प्रथमच एकाच दिवसात पाच कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारी (12 मार्च) कोल्हापूर शहरात तीन तर इचलकरंजीमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

अंबरनाथमध्ये एकच शिवसेना राहणार

अंबरनाथमध्ये ठाकरे गट शिवसेनेत विलीन होणार असून शहरप्रमुखांसह बहुतांशी पदाधिकारी राजीनामे देणार आहेत. यापुढं अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

पुणे विमानतळावर 24 वर्षीय महिलेचा राडा

पुणे विमानतळावर कार्यरत असलेल्या महिला सीआयएसएफ निरीक्षक यांच्यावर महिलेनं केला हल्ला. ही सर्व घटना पुणे विमानतळावर १२ मार्चला रात्री १२ वाजता घडली. याप्रकरणी पुणे विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सीआयएसएफ इन्स्पेक्टर (निरीक्षक) रूपाली ठोके (३९) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या संदर्भात गुंजन अगरवाल (२४) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

राहुल गांधींनी माफी मागावी, संसदेत सरकारकडून मागणी

भाजपने आज संसदेत राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावर हल्ला चढवला जिथे ते म्हणाले की देशाची लोकशाही ‘पूर्ववत झाली आहे’. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि माजी काँग्रेस अध्यक्षांना माफी मागण्यास सांगितले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज निषेध आणि जोरदार वादविवादांच्या मालिकेचे साक्षीदार होणार आहे.

गदारोळानंतर लोकसभा-राज्यसभेचं कामकाज तहकूब

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ६ एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान १७ बैठका होत आहेत. मात्र, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळं लोकसभा-राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

मुंबई : गोरेगाव परिसरात झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईतील गोरेगाव ओशिवरा परिसरातील एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 6 जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचं अपहरण

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचं अपहरण झालं आहे. प्रेम प्रकरणातून या तरुणाचं अपहरण केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या म्हात्रे पुलाजवळ या तरुणाचं अपहरण झालं होतं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ११ मार्चला हा तरुण म्हात्रे पुलाजवळून जात असताना रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी या तरुणाला घेरलं आणि त्या ठिकाणाहून त्याचं अपहरण केलं.

सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित

शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल क्लिपमुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी झाल्यामुळं सभागृहाची बैठक १० मिनिटांसाठी स्थगित करण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्तूल घेऊन रिल्स बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये अनुदान - मुख्यमंत्री शिंदे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून ३०० रुपये प्रति क्विंटल देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

मी माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी कागलमध्ये आलो; ED कारवाईनंतर मुश्रीफांची प्रतिक्रिया

कागल : मी माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज कागलमध्ये आलो आहे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफांनी ED कारवाईनंतर दिली आहे. आज ईडीसमोर हजर राहण्याचं समन्स होतं. माझे वकील ईडीकडून मुदत घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

ED कारवाईनंतर आमदार मुश्रीफ कागलमध्ये दाखल

कागलमधील घरावर ईडी कारवाई झाल्यानंतर आज आमदार हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाल्याचं कळतंय. कागलमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

प्रकाश सुर्वेंच्या मुलाची पोलिसांत धाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान शीतल म्हात्रे आणि भाजपा आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हि़डीओवरुन सध्या राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. या व्हिडीओच्या विरोधात आता प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक कऱण्यात आली आहे. यातल्या काही जणांचं उद्धव ठाकरे गटाशी संबंध असल्याचंही आढळून आलं आहे. पण या तिघांविरोधात आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

आजपासून सर्वसामान्यांना विधिमंडळ परिसरात येण्यास बंदी

आजपासून सर्वसामान्यांना विधिमंडळ परिसरात येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळं विधिमंडळ कार्यालयाकडून पास देण्यासाठी नकार दिला आहे. मागील दोन आठवड्यात विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याच्या आमदारांच्या तक्रारी होत्या, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाडा, विदर्भात पावसाच्या हलक्या सरीची शक्यता

मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यात तुरळक आणि हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. 

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र; खर्गेंनी बोलावली मोठी बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज म्हणजेच, सोमवारपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या दुसऱ्या सत्रापूर्वीच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी अदानी, महागाई आणि एजन्सींचा कथित गैरव्यवहार यासह अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बैठक बोलावली आहे.

एक दिवस पाकिस्तान-बांगलादेश स्वतःच भारतात विलीन होतील - शंकराचार्य

ग्वाल्हेर : एक दिवस पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) स्वतःच भारतात विलीन होतील, असा विश्वास पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज (Nischalananda Saraswati Maharaj) यांनी व्यक्त केला. ते एका दिवसाच्या मुक्कामावर ग्वाल्हेरला आले होते. आजच्या युगाशी संबंधित अनेक मुद्दे त्यांनी इथं मांडले. शिवाय, त्यांनी बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या मागणीवर मत मांडलं, तर दुसरीकडं मुस्लिम धर्मगुरूंच्या मुस्लिम राष्ट्राच्या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण

मुंबईच्या तापमानात वाढ झाली असून मार्च महिन्यातच आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. सांताक्रूझ वेधशाळेनं हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च कमाल तापमान काल नोंदवलं. सांताक्रूझ 39.4 अंश सेल्सिअस, कुलाबा 35.8 अंश सेल्सिअस असं तापमान आहे.

मेक्सिको : बारवर गोळीबार; हल्ल्यात 7 पुरुषांसह 3 महिला ठार

मेक्सिको : मेक्सिकोतील गुआनाजुआटो (Mexico Guanajuato) इथं सशस्त्र लोकांनी एका बारवर हल्ला केल्यामुळं दहा जणांचा गोळीबारात मृत्यू झाला. या हल्ल्यात पाच जण जखमीही झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. मृतांमध्ये सात पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शनिवारी स्थानिक वेळेनुसार, रात्री 11 वाजल्यानंतर एल एस्टाडिओ बारमध्ये हा हल्ला झाला.

छत्रपती संभाजीनगर : संग्रामनगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

संग्रामनगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळं 3 लाख नागरिकांना फटका बसणार आहे. जुन्या शहराला सातारा देवळाई परिसराशी जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. संग्रामनगर उड्डाणपूल गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे.

काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्री रेड्डी यांचा पक्षाला राम राम

आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण कुमार रेड्डी हे सध्या भाजप हायकमांडच्या संपर्कात आहेत. इतकेच नव्हे तर भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही पार पडल्या असल्याचे बोलले जात आहे.

राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल सांगितलं आहे. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणीही केली आहे.

हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर ते गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स  बजावण्यात आले आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. मात्र, मुश्रीफ ईडी कार्यालयात आज प्रत्यक्ष उपस्थित उपस्थित राहणार नाहीत. ते त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफांच्या वतीनं अॅड प्रशांत पाटील हे ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.

RRR चित्रपटातील Natu Natu गाण्याला ऑस्कर

आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडत आहे. तमाम भारतीय प्रेक्षकांच्या, चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट आत घडली आहे. ज्या क्षणाकडे भारतीय डोळे लावून बसले होते तो सुवर्णक्षण याची देही याची डोळा लाखो जणांनी अनुभवला आहे. एस एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.

Maharashtra National Live Updates : राज्यात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी सुरु असून त्यातच राऊतांनी भाजप आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही लिहिलं आहे. याशिवाय, ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरु असून यात भारतानं मोहर उमटवली आहे. यासह शहरातील बातम्या, गावखेड्यातील सर्व अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com