
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
गुजरातच्या पाटणध्ये तुफान पाऊस, अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी बचावकार्य सुरु
मुसळधार पावसामुळे गुजरातमधील पाटणच्या काही भागात पाणी साचले आहे. पाण्यामुळे अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरद्वारे सुखरुप बाहेर काढले जात आहे.
पुलवामा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा
पुलवामा येथील अवंतीपोरा येथील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बिहारमधील चार जणांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यांनी ही माहिती दिली.
प्रशिक्षणार्थींचं विमान नक्षलग्रस्त भागात कोसळलं
महाराष्ट्रातील बिरसी येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. तेथून प्रशिक्षणार्थी विमानाने दुपारी दोन वाजता उड्डाण केले होते. अडीच तासांनंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याचा शेवटचा ठावठिकाणा सापडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
मीरारोड भागात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला सुरुवात
चमत्कारांच्या दाव्यामुळे अडचणीत सापडलेल्या बागेश्वर बाबांचा कार्यक्रम मुंबईतल्या मीरा रोड भागात आयोजित करण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या विरोधानंतरही हा कार्यक्रम सुरु झाला आहे.
NIA कडून PFI प्रकरणामध्ये 105 जणांवर आरोपपत्र
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) 105 आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे.
महाराष्ट्रात गारपीट, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
राज्याच्या अनेक भागात आज गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद या जिह्यात गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस आणि गारपीट झाली.
अमरावतीमध्ये H3N2 विषाणूचे तीन रुग्ण आढळले
महाराष्ट्रात एच३एन२चे रुग्ण वाढतांना दिसून येत आहेत. काल पुण्यात काही रुग्ण आढळून आल्यानंतर आज अमरावतीमध्ये तब्बल तीन रुग्ण आढळून आले आहेत.
'त्या' प्रकरणी फडणवीसांसोबत मुख्यमंत्री शिंदेची चौकशी करा- सुषमा अंधारे
एकनाथ शिंदे यांनीच जयसिंघानी यांची उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट घालून दिली होती का ? याची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Live Update : नुकसानीची माहिती मोबाईल क्रमांकावर पाठवा; कृषिमंत्र्यांकडून नंबर जारी
अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. गारपिटीनं झालेल्या नुकसानीनं बळीराज्याला अश्रू अनावर झाले. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
मोर्चातील शेतकऱ्यांचा मृत्यू सरकारच्या हलगर्जीपणामुळे - संजय राऊत
शेतकऱ्याच्या मृत्यूचं सरकारनं प्रायचित्त घ्यावं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी राज्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
सरकारच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च स्थगित
सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे पी गावित यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
संगमनेरमध्ये भीषण अपघात; टँकर-दुचाकीच्या धडकेत 3 ठार
संगमनेरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात ही घटना घडली आहे.
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 तास बंद
कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 तास बंद राहणार आहे. 18 मार्चला रात्री 11 ते 19 मार्चला पहाटे 2 वाजेपर्यंत, तसेच 23 मार्चला रात्री 11 ते 24 मार्च 2023 ला पहाटे 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल. व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
रामनगर भागात चार चाकी गाड्या फोडल्या, सिंहगड पोलिसांचा तपास सुरु
सिंहगड रस्ता : येथील माणिक बाग परिसरातील रामनगर भागात चार चाकी गाड्या फोडण्यात आल्या. पाच चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. गाड्यांचं नुकसान करण्यात आलं आहे. याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला. अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतून प्रवास करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल असंच मनात येतं. पण सुदैवाने तिघांच्या मधून डिव्हायडरचा रॉड आरपार गेला. या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे, त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चित्रा वाघ यांना न्यायालयाचा दणका; मेहबूब शेख प्रकरणातील अर्ज फेटाळला
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा मेहबूब शेख प्रकरणातील अर्ज फेटाळून लावत मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र याविरोधात चित्रा वाघ यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन, या दाव्याला आव्हान देणारा दिवाणी पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. मात्र छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या न्या. गौरी गोडसे यांनी चित्रा वाघ यांचा अर्ज फेटाळताना बीड दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज पाचवा दिवस
राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी आजही संपावर आहेत. सरकारी यंत्रणेवर या संपाचा मोठा परिणाम झाला असून अनेक सरकारी विभागातील कामे गेल्या पाच दिवसांपासून रखडली आहेत.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरच्या कळंबा इथल्या घरी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं.
भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही - अमित शाह
अमेरिका (America) आणि इस्रायलनंतर (Israel) भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणी करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले, आज भारताची (India) स्थिती खूप मजबूत आहे. आज जगात कोणीही भारताच्या सीमा आणि लष्कराशी छेडछाड करू शकत नाही. अमित शाहांनी आपल्या भाषणातून शत्रू देशांना हा एकप्रकारचा इशाराच दिलाय.
बागेश्वर बाबा मुंबईत दाखल; मिरा रोड इथं होणार कार्यक्रम
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे मध्यरात्री मुंबई विमानतळाहून मिरा रोड इथं कार्यक्रमासाठी भाईंदर पश्चिमेकडं असलेल्या श्री माहेश्वरी भवनात पोहचले आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचा भाईंदरच्या माहेश्वरी भवनात मुक्काम असणार आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा आजपासून दोन दिवसीय कार्यक्रम मिरा रोड इथं पार पडणार आहे.
अमरावती जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
अमरावती जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळं काढणीला आलेल्या गहू पिकाचं, कांदा, संत्र्याचं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.
आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण, अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.