
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद्म पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात वर्ष 2023 साठी पद्म पुरस्कार प्रदान करत आहेत. या पद्म पुरस्कारांपैकी सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री आहेत. राष्ट्रपतींनी सर्वप्रथम वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांचा गौरव केला. त्यांच्या मुलीला हा सन्मान मिळाला. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण प्रदान करण्यात आले.
फडणवीसांनी काल राजकीय धमकी दिलीय; आदित्य ठाकरेंचं मिश्कील वक्तव्य
आज आदित्य ठाकरेंना पत्रकारांने सध्या तुमच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे आणि फडणवीसांनी देखील लग्नासाठी पुढकार घेतला आहे का म्हणत प्रतिक्रिया विचारली. याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अरे बाबा कालपासून, काल त्यांनी राजकीय धमकी दिली आहे. इतरांना वेगळी असते. पण काल गंमत-जंमत चाललेली, असं मिश्किल उत्तर आदित्य ठाकरे यांनी हसून दिलं.
मनीष सिसोदियांना ५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी
आपचे नेते मनीष सिसोदियांना ५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार - राजू शेट्टी
कोल्हापूर : “आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढताना पूर्ण तयारीने उतरणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे,” असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले. आंबा (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबीरास सुरुवात झाली आहे.
पुण्यात ओशो आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पुण्यातील ओशो आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी अनेक भक्तांना ताब्यात घेतलं असून ओशो आश्रमातील परिस्थिती चिघळली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ओशो आश्रम प्रशासन आणि ओशो भक्तांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
गुढी पाडव्यानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. रात्रीच मंदिराला आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई आणि याबरोबरच फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी रात्रीच लोकांनी मोठी गर्दी केली होती. आज पहाटेपासूनच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.
गडकरी धमकी प्रकरणातील तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
मंगळवारी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आता एका तरुणीला मंगलोर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. या प्रकरणात नागपुरातल्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या लोकसभा प्रवास योजनातंर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उद्यापासून (23 मार्च) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामधील गावात केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
कोल्हापूरसह गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
कोल्हापूरसह गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानानंतर पुढील तीन दिवसांमध्ये मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.
पुण्यात गुढी पाडवानिमित्त शोभायात्रेचं आयोजन
मंडईमधून या शोभा यात्रेला सुरुवात झाली आणि तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी समाप्त होणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत मर्दानी खेळ, ढोलताशे, ऐतिहासिक वारसा लाभललं चलचित्र या सारखे विविध गुण दर्शविणारे कलावंत सहभागी होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचं निधन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा तसेच हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कै. विक्रमराव सावरकर यांच्या अर्धांगिनी स्वामिनी सावरकर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
दादा भूसेंकडे फार लक्ष देण्याची गरज नाही - संजय राऊत
दादा भूसेंकडं फार लक्ष देण्याची गरज नाही. शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशाचं भूसे यांनी काय केलं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दादा भूसे यांच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं आहे.
'राज ठाकरे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री', मनसेची बॅनरबाजी
आज गुढीपाडवा आहे. हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस, राज्यात गुढीपाडव्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी गुढ्या उभारून मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. आज शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे बॅनर सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. राज ठाकरे यांच्या मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनर उभारण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा अशय असलेला मजकुर छापण्यात आला आहे.
चहा सांडल्याच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्रानं वार
चहा सांडल्याच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आला. अंगावर चहा सांडल्याचा राग मनात धरून दोघांनी मिळून तरुणावर वार केले. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी उदय साळवे (१९) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात राहुल राठोड, अंकुर जाधव असे आरोपींची नावे असून ही सगळी घटना १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता घडली.
डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती
गणेश मंदिर संस्थानचं 100 वं वर्ष तर नववर्ष स्वागत यात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं स्वागत यात्रेचा उत्साह काही औरच पहायला मिळत आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांची उपस्थिती आहे.
पाऊस, गारपिटीमुळं महाराष्ट्रात तब्बल 80 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. कृषी विभागातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'आतापर्यंत 80,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक नुकसानीमुळं प्रभावित झालं आहे. नुकसान तपासण्यासाठी पंचनामे प्रक्रिया अद्याप सुरू आहे.'
राज्यात गुढी पाडवानिमित्त मोठा उत्साह, घरोघरी उभारल्या गुढी
राज्यात आज गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.
तुळजा भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी राज्यभरातून मोठी गर्दी केली आहे. मराठी नवीन वर्ष व साडेतीन शुभ मुहूर्त असा योग साधत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. पहाटे ब्रह्म मुहूर्त असल्याने भाविकांनी देवीचे दर्शन घेत खण नारळ आणि साडीचोळीने ओटी भरली.
राज्यात काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
राज्यात काही भागांत पुढील चार दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये २५ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं ही माहिती दिली आहे.