Eknath Shinde  group Uddhav Thackeray news
Eknath Shinde group Uddhav Thackeray newsesakal

Shivsena Updates: शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या सर्व अपडेट एक क्लिकवर

राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

निकालावर चर्चा करता येत नाही, लोकं नवं चिन्ह स्विकारतात - शरद पवार

  • निकालावर चर्चा करता येत नाही

  • नवं चिन्ह घ्यायचं असतं. लोक नवीन चिन्ह स्वीकारतात

  • महिना-पंधरा दिवस चर्चा होईल

  • त्याचा फार परिणाम होत नाही

असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

धनुष्यबाण गहाण ठेवलेल्यांकडून तो हिसकावून घेतला

यांनी २०१९ साली महाविकास आघाडी स्थापन करून धनुष्यबाण गहाण ठेवला होता. हे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाणारं होतं त्यामुळे आता आम्ही गहाण ठेवलेला धनुष्यबाण हिसकावून घेतला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

हातात पेटती मशाल घेत शिवसैनिक मातोश्रीवर दाखल

शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाचा निकाल लागल्यानंतर हातात पेटती मशाल घेत शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसैनिकांकडून मोठ्या घोषणा देण्यात येत आहेत.

हा लोकशाहीचा विजय आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. अखेर सत्याचा विजय झाला आहे, आनंद दिघेंच्या विचारांचा विजय झाला आहे. लोकशाहीचा विजय झाला आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

भविष्यात ते मशाल चिन्हही हिसकावून घेतील - उद्धव ठाकरे

केंद्रीय निवडणूक आयोगात भाजपचे लोकं बसले आहेत. आज त्यांनी धनुष्यबाण हिसकावून घेतलं आहे उद्या मशाल हे चिन्हही हिसकावून घेतील.

राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटरवरून बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला असून मोठा संदेश दिला आहे. त्यामध्ये बाळासाहेब, "नाव जपा आणि नाव मोठं करा, एकदा की नाव गेलं की ते बाजारात सुद्धा मिळणार नाही" असं म्हणताना दिसत आहेत.

हिम्मत असेल तर निवडणुका घ्या - उद्धव ठाकरे

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून हा लोकशाहीचा अस्त आहे. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर आमचा लढा सुरू राहील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव सुपूर्द

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागले होते. ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर २०२२ पासून हे प्रकरण चर्चेत आले होते.

याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.

संजय राऊतांचे सिंधुदुर्गातील बॅनर्स प्रशासनाने काढले

भाजप नेते नारायण राणे यांच्या कोकणातील बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे इलाका तेरा धमका मेरा अशा आशयाचे बॅनर्स लावण्यास आले होते मात्र आता ते स्थानिक प्रशासनाने लगेच हटवले आहेत.

नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग पुंडलेस यांना शिवडीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते. या आदेशाला हरभजन सिंग रामसिंग पुंडलेस यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांची आव्हान याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचे आदेश कायम ठेवल्याने नवनीत राणा यांच्या वडिलांना दणका बसला आहे.

राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटील विराजमान

इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान Disney+ Hotstar सेवा डाऊन

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान OTT आणि लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar च्या सेवा डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. खाते वापरताना यूजर्सना अडचणी येत आहेत. युजर्सनी ट्विटरवर लॉगिन न होण्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील सेवा ठप्प झाल्याचे कन्फर्म केले आहे.

तुरूंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला; राऊतांचा खळबळजनक दावा

तुरूंगात असताना मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता असा धक्कादायक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केा आहे. ते रत्नागिरीत माध्यमांशी बोलत आहेत. मात्र, यावर आपण योग्यवेळ आल्यानंतर बोलू असे म्हणत राऊत म्हणाले की, राज्यात आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थीती असून, लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले.

यूपीत मी बंद पडलेले कारखाने बघायला गेलो होतो - शरद पवार

Sakal Maha Conclave : ग्रामीण महाराष्ट्रासाठी ही परिषद अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये साखर कारखानदारी आणि सहकार यांच्या प्रश्नांची चर्चा होणार आहे. या महापरिषदेला देशाचे सहकार मंत्री येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. ते बँकींग व साखर उद्योगासाठी आयोजित सहकार महापरिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, 'देशाच्या सहकार क्षेत्राची सूत्रं त्यांनी हाती घेतल्यानंतर, मी स्वतः त्यांना भेटायला गेलो आणि सत्कार करून महाराष्ट्राच्या प्रश्नांची मांडणी केली. सांगायला आनंद होतोय की, त्यांनी बहुतेक प्रश्नांची सोडवणूक केलीये. त्यामुळं या परिषदेत जे प्रश्न मांडले जातील, त्यासाठी अनुकूल प्रश्न असतील याची मला खात्री आहे.'

शिर्डीला सहलीला गेलेल्या 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अहमदनगर : शिर्डीतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास 88 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.

आमच्या दृष्टीनं सगळे आमदार (शिंदे गट) अपात्र - संजय राऊत

Shinde vs Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. या सुनावणीनंतर शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीये. अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आमच्या दृष्टीनं सगळे आमदार (शिंदे गट) अपात्र आहेत. आता त्यांच्यावर निवडणूक आयोग आणि न्यायालयानं शिक्कामोर्तब करायचं आहे. घटनाबाह्य सरकार कितीकाळ चालवायचं हे न्यायालयाला ठरवावं लागणार आहे, असं राऊत म्हणाले.

ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं नाही स्वीकारली

ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं स्विकारलेली नाही. त्यामुळं ठाकरे गटाची निराशा झाली आहे. खंडपीठाकडं जाणार आहे. त्याचबरोबर पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीला होणार आहे.

देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात चार ठार

चेनारी : चेनारी पोलीस ठाण्याच्या (Chenari Police Station) हद्दीत गुरुवारी रात्री उशिरा भाविकांनी भरलेली पिकअप उलटली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर, 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक पिकअपमधून कैमूर टेकडीवर असलेल्या गुप्ताधाम येथील गुप्तेश्वर महादेवाच्या (Gupteshwar Mahadev Temple) दर्शनासाठी जात असताना पिकअप उलटली. अपघातातील काही जखमींना उपचारासाठी चेनारी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय.

विरोधी पक्षनेते अजित पवार कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते शाहू कॉलेजमधील एन.डी.पाटील सभागृहाचं भूमिपूजन होणार आहे. अजितदादा शाहू कॉलेजच्या आवारात दाखल झाले आहेत.

ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर लागली आग

उरण येथील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर आग लागली आहे. मात्र, सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश असून अधून-मधून वणवा लागण्याच्या घटना सुरूच आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?

बुलढाणा : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे गुवाहाटीला (Guwahati) शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवाल तुपकरांनी केलाय. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. उठसूठ कुणालाही फोन करत असतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय, असा घणाघाती हल्लाही तुपकरांनी केला. रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. काल तुपकर बुलढाण्यात पोहोचले. त्यांचं कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोषात स्वागत केलं.

भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन

दिग्गज भारतीय फुटबॉलपटू (Legendary Indian Footballer) तुलदास बलराम (Tulsidas Balaram) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बलराम यांनी ऑलिम्पिक (Olympic) आणि आशियाई खेळांमध्ये (Asian Games) भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तुलसीदास बलराम यांच्या निधनाने क्रिडा जगतावर शोककळा पसरली आहे.

जम्मू आणि काश्मीर हादरलं! कटरा परिसरात भूकंपाचे धक्का

जम्मू आणि काश्मीरमध्ये ( Jammu Kashmir) भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 97 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी 5.01 वाजेच्या सुमारात भूकंपाचा झटका बसला. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार ही माहिती दिली आहे. 

भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ

भारतीय वंशाचे नील मोहन यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. त्यांना बढती देऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे. नील मोहन 2008 पासून गुगल सोबत काम करत आहेत. 2013 मध्ये कंपनीने त्यांना 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता.

सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात निकाल

राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. आज, शुक्रवारी १०:३० वाजेच्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल.या निकालाकडे राज्य आणि देशातील सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.

Live Updates Today : राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे, त्यामुळं शिवसेना नेमकी कोणाची असणार हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत, तर अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com