महाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जलप्रलयामुळे त्राहीमाम्‌ झालेल्या केरळसह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तमिळनाडू या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 51.59 अब्ज घनमीटर क्षमतेच्या 31 धरणांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 65 टक्के (33.57 अब्ज घनमीटर) पाणीसाठा झाला आहे.

नवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, पश्‍चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये धरणांची पातळी समाधानकारक होण्यासाठी मात्र आणखी पावसाची प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्रातील धरणे अद्याप निम्मीच भरली आहेत. दुसरीकडे, पूर्व भारतातील ओडिशा, छत्तीसगड; तर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांच्या धरणांमध्ये पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढला आहे. 

केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रमुख 11 धरणे ऑगस्टच्या मध्यापर्यंत 52 टक्के (84.74 अब्ज घनफूट) भरली आहेत. जलाशयांची साठवण क्षमता 161.99 अब्ज घनमीटर आहे. त्यातील 37 धरणांवर 60 मेगावॉटहून अधिक क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातच्या धरणांमधील पाणीसाठा निराशाजनक आहे. पश्‍चिम भारत क्षेत्रात येणाऱ्या या दोन्ही राज्यांमधील 27 जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा झाला आहे. या धरणांची साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर असली, तरी त्यात केवळ 35 टक्के म्हणजे 11.05 अब्ज घनमीटर साठा झाला आहे. गेल्या वर्षी यातील पाणीसाठा 50 टक्के होता. 

जलप्रलयामुळे त्राहीमाम्‌ झालेल्या केरळसह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तमिळनाडू या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 51.59 अब्ज घनमीटर क्षमतेच्या 31 धरणांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 65 टक्के (33.57 अब्ज घनमीटर) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हा संपूर्ण भाग दुष्काळाने होरपळला असताना या धरणांमध्ये केवळ 29 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदाचा पावसाळा दक्षिण भारताची तहान भागविणारा आहे. 

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांतील 18.01 अब्ज घनमीटर क्षमतेच्या सहा जलाशयांमध्ये 9.76 अब्ज घनमीटर (54 टक्के) पाणीसाठा झाला आहे; तर पूर्व भारतात येणाऱ्या झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये असलेल्या 15 धरणांमध्ये 8.87 अब्ज घनमीटर साठा झाला आहे. या धरणांच्या 18.83 अब्ज घनमीटर एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेत हा साठा 52 टक्के आहे. मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश; तसेच छत्तीसगड या राज्यांमधील 42.30 अब्ज घनमीटर क्षमतेच्या 12 धरणांमध्ये 48 टक्के म्हणजे 20.50 अब्ज घनमीटर पाणीसाठा झाला आहे. 

जलसाठा 

65 टक्के 
दक्षिण भारत 

54 टक्के 
उत्तर भारत 

52 टक्के 
पूर्व भारत 

48 टक्के 
मध्य भारत 

35 टक्के 
पश्‍चिम भारत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra needs more rain The highest in the south