पोषण अभियानाच्या 5 राष्ट्रीय पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर!

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 August 2019

मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात 'एकात्मिक बाल विकास सेवा योजने'मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात 'एकात्मिक बाल विकास सेवा योजने'मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै 2018 पासून राज्यात सुरु असलेल्या या योजनेच्या अमंलबजावणीच्या आधारे क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोषण अभियानाच्या अंमलबजावणीत 2015 अंगणवाड्यांत 3 लाख उपक्रम राबविणाऱ्या उस्मानाबाद जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि ए.एन.एम. कार्यकर्त्या यांच्या उत्तम समन्वयातून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल अहमदनगर जिल्हयातील नेवासा आणि नाशिक जिल्हयातील नाशिक-2 (शहर) या दोन प्रकल्पांचाही सन्मान करण्यात आला. 2 लाख 50 हजार रूपये, प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हयातील करवीर गट राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलावडे यांनी पुरस्कार स्वीकारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra won 5 National awards of National Nutrition Mission