
NIA Raid : टेरर फंडिंग विरोधात NIA ची मोठी कारवाई; 8 राज्यांत 70 हून अधिक ठिकाणी छापे, अनेक शस्त्रं जप्त
गँगस्टर टेरर फंडिंग प्रकरणी (Gangster Terror Funding Case) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये एकाच वेळी छापे टाकले जात आहेत.
अशी एकूण 70 ठिकाणं आहेत, जिथं एनआयएचे छापे पडत असल्याचं सांगण्यात येत आहे. गुंड आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या अड्ड्यावर हे छापे टाकले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएचा हा छापा लॉरेन्स बिश्नोईसारख्या (Lawrence Bishnoi) गुंडांवर आणि त्याच्या सर्व राज्यांतील निकटवर्तींवर टाकला जात आहे. यापूर्वी गेल्या वर्षाच्या अखेरीस दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, नीरज बवाना, टिल्लू ताजपुरिया आणि गोल्डी ब्रार आधीच एनआयएच्या रडारवर आहेत. याप्रकरणी एनआयएनं अनेक गुंडांची चौकशीही केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएनं उत्तर भारत आणि दिल्लीतील 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर एजन्सीनं एक गुंड आणि वकिलालाही अटक केली होती.