ममतांची "एनआरसी'बाबत अमित शहांसोबत खलबते

पीटीआय
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये ममतांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचाही (एनआरसी) विषय उपस्थित केला. या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी संवाद साधला.

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये ममतांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचाही (एनआरसी) विषय उपस्थित केला. या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी संवाद साधला. एनआरसीच्या यादीतून काही मूळ भारतीयांना देखील वगळण्यात आले असून, त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जावे अशी विनंती आपण गृहमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. एनआरसीच्या यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्यात बंगाली, हिंदी भाषकांप्रमाणेच गोरखा आणि आसामी लोकांचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

मी येथे पश्‍चिम बंगालमधील एनआरसीबाबत नाही तर आसाममधील एनआरसीबाबत बोलायला आले होते, असेही त्या म्हणाल्या. तत्पूर्वी ममतांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, तसेच राज्यातील कोळसा खाणीच्या उद्‌घाटनाचेही त्यांना निमंत्रण दिले होते.

आसाममधील नागरिकांची माहिती देणारी एनआरसीची अंतिम यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून यातून 19 लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे उघड झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहा यांनीही ममतांच्या मागणीची दखल घेत यात आपण लक्ष घालू, असे म्हटले आहे.

घटनात्मक कर्तव्य
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही त्यांच्या राज्यामध्ये एनआरसीची गरज नसल्याचे म्हटले आहे, याकडेही ममतांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबतची बैठक हे घटनात्मक कर्तव्य होते. याशिवाय आमच्याकडे अनेक सीमावाद प्रलंबित आहेत. बांगलादेश आणि भूतानच्या सीमा बिहार आणि झारखंडला लागून आहेत. ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणारा चिकन नेकचा भागही आमच्याकडे आहे, त्यामुळे या दृष्टीने देखील ही बैठक महत्त्वपूर्ण होती असे ममतांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamata banerjee and amit shah Meeting Politics