देशाला वाचविण्यासाठी मोदींना हटवा

सकाळ न्यूज नेटवर्क ः शामल रॉय
शनिवार, 7 जानेवारी 2017

आजच्या सद्यस्थितीत भर पडण्यापेक्षा उर्वरीत दोन वर्षाच्या काळात देशात राष्ट्रपती राजवट लागू केली तरी आपली त्यास हरकत नसेल.'' सध्याचे नेतृत्व कुचकामी असून मोदी कालीदासप्रमाणे ज्या फांदीवर बसले आहेत. तीच फांदी तोडत आहेत. आता केवळ राष्ट्रपतीच देशाला वाचवू शकतात

कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली आहे. सरकारची सुत्रे भाजपच्या अन्य नेत्यांच्या हाती गेली तरी, आपला त्यास आक्षेप असणार नाही, असेही ममता यांनी स्पष्ट केले.

एका मुलाखतीदरम्यान त्या बोलत होत्या. ममता म्हणाल्या, ""नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात आज जी स्थिती उद्भवली आहे, त्यास सर्वस्वी मोदी जबाबदार असून, त्यांना तातडीने पदावरून हटविणे गरजेचे आहे. सद्यःस्थिती अस्वीकारार्ह असून, त्यांच्याऐवजी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह किंवा अरुण जेटलींनी सरकारचे नेतृत्व करावे. आजच्या सद्यस्थितीत भर पडण्यापेक्षा उर्वरीत दोन वर्षाच्या काळात देशात राष्ट्रपती राजवट लागू केली तरी आपली त्यास हरकत नसेल.'' सध्याचे नेतृत्व कुचकामी असून मोदी कालीदासप्रमाणे ज्या फांदीवर बसले आहेत. तीच फांदी तोडत आहेत. आता केवळ राष्ट्रपतीच देशाला वाचवू शकतात. असेही त्या म्हणाल्या.

देशातील 1.7 कोटी लोकांना नोटाबंदीचा थेट फटका बसला असून सुमारे 81.5 लाख जणांना त्यांची नोकरी यामुळे गमवावी लागल्याची माहिती ममता यांनी एका पाहणी अहवालाच्या हवाल्याने या वेळी दिली.

तृणमूल कॉंग्रेसचे नेते तपस पाल व सुदीप बंडोपाध्याय यांना रोझ व्हॅली चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी नुकतीच अटक झाली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या, ""केंद्र सरकार कोणत्याही विरोधकाला सहन करण्याच्या मनस्थितीत नसून, मोदी व अमित शहा यांच्याविरोधात बोलण्यामुळे त्यांनी सीबीआयला आमच्या पाठीशी लावले आहे. विरोधी पक्षांसोबत सीबीआय केंद्राचे एजंट असल्यासारखे वागत आहे.''

बंगालच्या इतिहासात पहिली घटना
प. बंगालच्या आतापर्यंतच्या इतिहासात सत्ताधारी तृणमूलच्या कोणत्याही नेत्यावर सीबीआयकडून गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असून, सीबीआयकडे अटक केलेल्या तपस पाल व सुदीप बंडोपाध्याय या नेत्यांविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा तृणमूल नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी केला आहे.

Web Title: Mamata meets President, demands removal of modi