'देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है'; सिसोदियांनी लिहिलं भावनिक राजीनामापत्र : Manish Sisodia Resign | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dy CM Manish Sisodia

Manish Sisodia Resign: 'देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है'; सिसोदियांनी लिहिलं भावनिक राजीनामापत्र

नवी दिल्ली : दिल्लीत दारुवरील कथीत एक्साईज ड्युटी घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयनं अटक केली असून ते पाच दिवसांच्या कोठडीत आहेत. सुप्रीम कोर्टाकडून या अटकेपासून दिलासा मिळेल अशी त्यांना आशा होती पण कोर्टानं त्यांच्या याचिकेची दखल घेतली नाही. त्यानंतर अखेर सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एक भावनिक पत्र लिहित त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडं सुपूर्द केला आहे. (Manish Sisodia Resignation write a emotional letter to CM Arvind Kejriwal)

सिसोदियांनी आपल्या पत्रात महान क्रांतीकारक भगतसिंग यांच्या गीताचा उल्लेख केला आहे. 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलं में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है!' आपल्या राजीनामापत्रात या गाण्यांच्या ओळी लिहित त्यांनी केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल यांना उद्देशून सिसोदिया म्हणतात, "मला माहिती आहे की, कट-कारस्थान रचणारे मला आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी मला तुरुंगात टाकत आहेत. पण त्यांच्या या कारस्थानांमुळं आपली खऱ्या राजकारणाची लढाई अधिक मजबूत होईल. माझ्या तुरुंगात जाण्यानं आपल्या सहकाऱ्यांचं मनोबल अधिकच वाढेल"

शालेय जीवनाचा दिला दाखला

सिसोदिया यांनी तीन पानाच्या राजीनामापत्रात आपल्या शालेय जीवनाचा दाखलाही दिला. त्यांनी म्हटलं, मी जेव्हा सहावीच्या वर्गात शिकत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या खोलीमध्ये भगवान श्रीकृष्णाची फोटो फ्रेम करुन लावला होता. या फोटोखाली त्यांनीच एक वाक्य लिहिलं होतं. 'स्वतःचं काम इमानदारी आणि निष्ठेनं पूर्ण करणं हीच खरी कृष्ण पूजा आहे' बारावीच्या वर्गात जाईपर्यंत मी हे वाक्य रोज पाहत आलो. माझ्या वडिलांमुळं आज घडलो आहे. त्यामुळं जगातील कुठलीही शक्ती माझ्याकडून बेईमानी करवून घेऊ शकत नाही किंवा कामाप्रती माझी निष्ठ कमी करु शकत नाही.

अनेक एफआयआर दाखल

माझ्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या. मला घाबरवणं, धमकावून, लालच दाखवलं. मी त्यांच्यासमोर झुकलो नाही तर त्यांनी आज मला तुरुंगात टाकलं. पण मी यांच्या तुरुंगानाही घाबरत नाही. कारण खरेपणाच्या मर्गावर चालताना तुरुंगवास भोगणारा मी काही पहिला व्यक्ती नाही.

अनेकांचे आशीर्वाद पाठीशी

दिल्ली सरकारच्या विविध विभागांत मी इमानदारीनं काम केलं आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुलं, त्यांच्या माता-पित्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या हजारो शिक्षकांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. लवकरच खरं समोर येईल आणि माझ्यावरील आरोप खोटे आहेत हे स्पष्ट होईल. पण मला यांची खोटेपणा करुन तुरुंगात टाकलचं आहे तर सध्या माझी मंत्रीपदावर राहण्याची इच्छा नाही. त्यामुळं मी आपला राजीनामा सादर करत आहे. मला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं.