Manish Tewari : मुख्यमंत्री बदलणे हा अकार्यक्षमतेचा पुरावा; मनीष तिवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Tewari statement Changing gujrat Chief Ministers is proof of inefficiency politics

Manish Tewari : मुख्यमंत्री बदलणे हा अकार्यक्षमतेचा पुरावा; मनीष तिवारी

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री बदलण्याचा भाजपचा निर्णय हा येथील सरकार अकार्यक्षम असल्याचा ठोस पुरावा आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी म्हणाले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीनिमित्त तिवारी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. भाजपने २०१६मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रूपानी यांना मुख्यमंत्रिपदी बसविले. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही रूपानी यांच्याकडेच राज्याचा कारभार होता. पण गेल्या वर्षी त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली. यावर बोलताना तिवारी म्हणाले, ‘‘तीन वेळा मुख्यमंत्री बदलण्याची वेळ यावी, यापेक्षा राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेचा यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो.

विद्यमान मुख्यमंत्र्यांचे काय होणार, हे जनताच ठरवेल. तिवारी यांनी मोरबी पुलाच्या दुर्घटनेचा उल्लेख करीत राज्य सरकारच्या अहंकारावरून टीका केली. या दुर्घटनेनंतर एकानेही राजीनामा का दिला नाही. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी, धनवान व्यक्ती आणि पूल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल तिवारी यांनी केला. गुजरातमध्‍ये भ्रष्टाचाराला वैधता दिली असून तेच प्रारूप देशावर थोपविले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘आप’कडे अनुभव नाही

आम आदमी पक्षाच्या (आप) संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर तिवारी म्हणाले,‘‘पाकिस्तानच्या सीमेलगतच्या पंजाब राज्याचा कारभार करण्यासाठी ज्‍या प्रकारचा प्रशासकीय अनुभव, संवेदनशीलता आणि जबाबदारीची गरज आहे, ती ‘आप’च्या नव्या सरकारकडे नाही.

लक्ष विचलित करण्यात पीएच.डी

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावरून भाजप विरोधकांना लक्ष्य करीत आहे. त्यावर तिवारी म्हणाले, की महागाई, बेरोजगारी, कोरोना व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार आदी प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्यात राज्य सरकारने पीएच.डी केलेली आहे. पंतप्रधान विकासावर का बोलत नाहीत. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा भाजप बेरोजगारी, महागाई, कोरोना किंवा भ्रष्टाचारासारखे जनतेला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांकडे भाजप दुर्लक्ष करतो.