
याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती.
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती, मात्र या प्रकरणावरील सुनावणी आजच म्हणजे 20 जानेवारी रोजी लिस्ट झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी ही 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. याआधी 11 तारखेला मराठा आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारची आणि वकिलांची दिल्लीत बैठक झाली होती.
मराठा आरक्षणावर सरकारने संपूर्ण तयारीनीशी न्यायालयीन लढाई लढावी. आम्ही तयारी केली आहे, असं मराठा मोर्चाचे समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी सुप्रीम कोर्टात गेल्या महिन्यात 9 डिसेंबरला सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास नकार दिला. यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला झटका बसला. तसंच 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणावर अखेरची सुनावणी सुरू केली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं.
सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट या न्यायमूर्तींचा या घटनापीठात समावेश आहे.