
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, तालकटोरा स्टेडिअम, दिल्ली, ता. २१ ः ‘‘भाषेत शुद्ध, अशुद्ध असे काहीही नसते. मराठीने सर्व बोलींना आणि सर्वसामान्यांच्या भाषेला सामावून घेतले, तरच ती खऱ्या अर्थाने अभिजात होईल,’’ असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी शुक्रवारी केले. मराठी भाषा टिकवायची असेल, तर उत्सव करून भागणार नाही. त्यासाठी मराठी भाषा बोलणारी, वाचणारी, लिहिणारी पिढी निर्माण करावी लागेल, हे त्यांनी अधोरेखित केले.