दंगली भडकवणे भाजपचा धर्म ; केजरीवालांची टीका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

''कोरेगाव भीमा येथील हिंसेदरम्यान भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांकडून दलितांवर हल्ले केले गेले. आम्ही या घटनेचा निषेध करतो. जाती-धर्माच्या आधारावर दंगली भडकवणे हाच भाजपचा धर्म आहे''

अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली 

बुलडाणा : ''कोरेगाव भीमा येथील हिंसेदरम्यान भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांकडून दलितांवर हल्ले केले गेले. आम्ही या घटनेचा निषेध करतो. जाती-धर्माच्या आधारावर दंगली भडकवणे हाच भाजपचा धर्म आहे'', अशी टीका आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) केली.

राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील हजारो शाळा बंद होत आहेत. ज्या पक्षाकडून शाळा चालवल्या जाऊ शकत नाही. तो पक्ष सरकार काय चालणार असा सवाल त्यांनी केला. तसेच सरकारला शाळा चालवता येत नाही. मात्र, मलाई खायला येते, असेही ते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, मागील तीन वर्षात दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये क्रांती झाली आहे. एकही शाळा बंद केली नाही. नव्या शाळा सुरु केल्या. तसेच दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बनत आहेत. हे सगळे दिल्लीत होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, भाजपने शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केला. महाराष्ट्राच्या जनतेने यांच्याकडे यासाठी सत्ता दिली नव्हती, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national Arvind Kejriwal condemns Bhima Koregaon violence says instigating riots is BJPs creed