बाजार समित्या बंद होणार नाहीत -  पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या व्हर्च्युअल सभेदरम्यान मोदींनी कृषी सुधारणांचे समर्थन केले. कृषी सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांना आणि कृषी व्यवस्थेला आत्मनिर्भर बनविण्याचा हा प्रयत्न असल्याचाही दावा त्यांनी केला.

नवी दिल्ली - कृषी सुधारणा विधेयकांविरुद्ध राजकीय वातावरण तापल्यानंतर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले आहे. कोणत्याही परिस्थितीत एमएसपी व्यवस्था आणि बाजार समित्याही बंद होणार नाहीत, असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच आतापर्यंतच्या कायद्यांनी शेतकऱ्यांचे हातपाय बांधले होते आणि शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या शक्तिशाली टोळ्या निर्माण झाल्या होत्या, असा प्रतिहल्लाही मोदींनी विरोधकांवर चढवला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या व्हर्च्युअल सभेदरम्यान मोदींनी कृषी सुधारणांचे समर्थन केले. कृषी सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांना आणि कृषी व्यवस्थेला आत्मनिर्भर बनविण्याचा हा प्रयत्न असल्याचाही दावा त्यांनी केला. बिहारमधील १४२५८ कोटी रुपयांच्या महामार्ग योजनांचे भूमिपूजन आणि ४५९४५ गावांना ऑप्टिकल फायबरने जोडण्याच्या योजनेचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. 

मोदी म्हणाले की, कृषी सुधारणा काळाची गरज आहे. यामुळे शेतकरी मोठ्या साठवण गृहे, शीतगृहांमध्ये माल साठवू शकतील. माल साठविण्याशी संबंधित कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर शीतगृहांची साखळीही विकसित होईल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील सध्याच्या उत्पादन आणि विक्री व्यवस्थेशी संबंधित कायद्यांनी शेतकऱ्यांचे हातपाय बांधले होते. या कायद्यांच्या संरक्षणाखाली शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उकळणाऱ्या शक्तिशाली टोळ्या तयार झाल्या होत्या. काल संसदेने शेतकऱ्यांना नवे अधिकार देणारे ऐतिहासिक कायदे संमत केले आहेत. कृषी सुधारणेचे हे कायदे २१ व्या शतकातील भारताची गरज आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market committees will not close says Narendra modi