देशभर रविवारी जनता कर्फ्यू ;  पंतप्रधान मोदींची घोषणा

narendra modi
narendra modi

नवी दिल्ली - सध्यातरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारात कोणतेही औषध उपलब्ध नाही, संकल्प आणि संयम या द्विसुत्रीच्या आधारेच या भीषण संकटाचा सामना करता येईल. त्यासाठी रविवारी (२२ मार्चला) सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत "जनता कर्फ्यू' (जनता संचारबंदी) पाळावा, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना जबाबदारीचे भान बाळगण्याची सूचना केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या "राष्ट्ररक्षकांप्रती' कृतज्ञता व्यक्त करण्याची सादही त्यांनी घातली. 

विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठच्या सुमारास देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी स्वेच्छेने निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन करून पंतप्रधानांनी कोरोनाच्या गंभीर धोक्‍याची जाणीव करून दिली. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात मोदींनी "सामाजिक अलिप्तेतून' कोरोनाशी सजगतेने मुकाबला करता येऊ शकतो असे सांगतानाच जीवनावश्‍यक सामानाची साठेबाजी टाळण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्यांना मानवीय दृष्टिकोनातून आणि संवेदनशीलतेने मदत केली जावी, असे आवाहन केले. 

अर्थव्यवस्थेवर परिणाम 
या भयंकर साथीच्या रोगाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची कबुलीही पंतप्रधान मोदींनी दिली. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली "कोविड-१९ इकॉनॉमिक टास्क फोर्स' हा विशेष कृतिगट स्थापन केला जाणार असून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय केले जातील, असे मोदींनी सांगितले. 

राज्य सरकारांना साद 
भारताने कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला मागील दोन महिन्यांत सक्षमपणे केला असला तरी ही वेळ निश्‍चिंत होण्याची नाही. प्रत्येकाने सजग, सावध राहावे, असे सांगत मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. ""जनता कर्फ्यू ही जनतेसाठी जनेतेने स्वतःवर लावलेली संचारबंदी असून रविवारी (२२ मार्च) सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सर्व देशवासीयांनी जनता संचारबंदीचे पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये. हा आत्मसंयम देशहितासाठी कर्तव्यपालनाच्या संकल्पाचे प्रतीक असेल. २२ मार्चच्या जनता संचारबंदीचे अनुभव आपल्याला पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवेल. राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूच्या पालनासाठी नेतृत्व करावे'', असे मोदी म्हणाले. 

राष्ट्ररक्षकांना सलाम करावा 
मागील दोन महिन्यांपासून वैद्यकीय सेवा, विमान वाहतूक सेवा, सरकारी सेवा, प्रसारमाध्यमे, सुरक्षा, होम डिलिव्हरी या सेवांमध्ये लाखोजण काम करत आहेत. सध्याच्या स्थितीत या सेवा देणे सोपे नाहीत. संसर्गाचा धोका पत्करून हे सर्वजण "राष्ट्ररक्षकाप्रमाणे' कर्तव्य बजावत आहेत. देशाने अशा सर्व व्यक्ती, संघटनांचे रविवारी आभार मानावे. सायंकाळी पाचला टाळ्या वाजवून, थाळी अथवा घंटी वाजून कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या धैर्याला सलाम करावा. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी रविवारी सायरनद्वारे याची माहिती लोकापर्यंत पोहोचवावी, असेही आवाहन मोदींनी केले. 

इतरांनी अलिप्त राहावे 
सरकारी सेवा, वैद्यकीय सेवा, लोकप्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींची सक्रियता आवश्‍यक आहे. मात्र इतरांनी स्वतःला अलिप्त राखण्याची काळजी घ्यावी, असे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की कोरोना संसर्गापासून बचावासाठी कोणताही ठोस उपाय नसून त्याची लसही बनू शकलेली नाही. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्येच्या देशावर कोरोनाचा परिणाम होणार नाही, असे मानणे चूक ठरेल. या वैश्‍विक महामारीला तोंड देण्यासाठी संकल्प आणि संयमाची आवश्‍यकता आहे. "आपण निरोगी तर जग निरोगी' या मूलमंत्राचे पालन करून स्वतःला आणि इतरांनाही संसर्ग होण्यापासून वाचवावे, गर्दीपासून दूर राहावे, आणि घरातून बाहेर निघणे टाळावे. वयस्कर व्यक्तींना घराबाहेर पडू देऊ नये."सोशल डिस्टन्सिंग' (सामाजिक अलिप्तता) कोरोनाच्या मुकाबल्यात महत्त्वाचा उपाय ठरेल अशी सूचना मोदींनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com