
बँकॉक : म्यानमार आणि त्याच्या शेजारील थायलंडला शुक्रवारी हादरवून सोडणाऱ्या ७.७ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या दीड हजारांवर पोचली असून २ हजार ३७६ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या दोन्ही देशांकडे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून उद्ध्वस्त झालेल्या इमारतींखालील मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विविध ठिकाणांवरील आणखी शेकडो नागरिकांचा ठावठिकाणा लागला नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अनधिकृत वृत्तानुसार येथील मृतांची संख्या दहा हजारांपेक्षाही अधिक असू शकते. म्यानमारला मदत सामग्री पोचविण्यासाठी भारताने ऑपरेशन ‘ब्रह्म’ची सुरूवात केली आहे.