‘संघा’ला खुश करण्यासाठी बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mayawati criticism central government

‘संघा’ला खुश करण्यासाठी बंदी

लखनौ : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्वार्थापोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) खूष करण्यासाठी पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याची टीका बसप अध्यक्षा मायावती यांनी ट्विटद्वारे केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या देशभरातील मागण्यांमागे हा निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केला.

मायावती यांनी हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की देशभरात विविध मार्गांनी ‘पीएफआय’ला लक्ष्य केल्यावर काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांआधी ‘पीएफआय’सह आठ संलग्न संस्थांवर केंद्राने बंदी घातली. राजकीय स्वार्थाच्या धोरणातून व संघाच्या तुष्टीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यात समाधान कमी आणि अस्वस्थता अधिक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की सरकारचा हा हेतू सदोष मानून विरोधक त्यामुळेच सरकावर हल्लाबोल करत आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने ‘पीएफआय’सारख्या संघटनेवर बंदी घातली जात असेल तर ‘आरएसएस’सारख्या इतर संघटनांवर बंदी का घालण्यात येऊ नये, असा सवालही त्यांनी केला आहे.

संघावर बंदीची मागणी दुर्दैवी : बोम्मई

बंगळूर : सिद्धरामय्या यांचे संघावर बंदी घालण्याचे वक्तव्य हे मोठे दुर्दैव आहे. त्यांच्या विधानाला कोणताही आधार नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. ते शुक्रवारी हुबळी येथे बोलत होते. दरम्यान, त्यांनी आज अलमट्टी जलाशयाचे पूजन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. पीएफआयवर बंदी का घातली, हे विचारण्याचा त्यांना कोणताही आधार नाही. यापूर्वी त्यांनी स्वतः पीएफआयवरील खटले मागे घेतले होते. ते लपविण्यासाठी संघावर बंदी घालण्याची ते मागणी करीत आहेत, असा प्रतिवाद त्यांनी केला. संघ ही देशभक्त आणि गरिबांना मदत करणारी संघटना आहे. जेव्हा देश संकटात सापडला, तेव्हा आरएसएस अनेक प्रकारे मदतीला आला. जी संघटना देशात देशभक्ती जागवते. दीनदुबळ्या, गरीब मुले, अनाथ यांच्यासाठी संघटना उभी राहते. अशा संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :BanRSSmayawatiCriticism