
Mental Health : कामाच्या ठिकाणी मानसिक सुरक्षितता महत्त्वाची
नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणे मानसिक आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य, समाधानी वृत्ती, नवोन्मेषाची उर्मी, कंपनीत राहण्याची इच्छा या सर्वांवर त्याचा परिणाम होत असतो. आता कंपन्यांनीही याचे महत्त्व ओळखले असून, त्यादृष्टिने धोरणात्मक बदल केले जात आहेत, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
कामाच्या ठिकाणी मानसिक सुरक्षितता कशी महत्त्वाची आहे याचा अभ्यास करणारा हा अहवाल जी ग्रुप होल्डिंग इंडिया या मनुष्यबळ सेवा क्षेत्रातील जागतिक कंपनीने सादर केला आहे. बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, मुंबई, एनसीआर व हैदराबाद या सहा प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रमुख क्षेत्रांतील ५०० हून अधिक कंपन्या व एक हजारपेक्षा अधिक कर्मचारी यांनी भाग घेतला होता.
या अहवालानुसार, सुमारे ९४ टक्के कर्मचाऱ्यांनी मानसिक आरोग्याच्या सुरक्षिततेची अपरिहार्यता ओळखली आहे. तर ७४ टक्के कर्मचाऱ्यांनी असुरक्षितता मानसिक आरोग्यास हानी पोहोचवू शकते, असे म्हटले आहे. ७९ टक्के कंपन्यांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आवश्यक असून, त्यास प्राधान्य देत असल्याचे म्हटले आहे.
५७ टक्के कंपन्यांना मानसिक सुरक्षिततेच्या संकल्पनेची माहिती आहे, तर ३५ टक्के कर्मचाऱ्यांनी याविषयावरील जागरूकता, शिक्षण याची गरज अधोरेखित केली आहे. २६ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांपैकी ९६ टक्के कर्मचाऱ्यांना मानसिक स्वास्थाच्या महत्त्वाची जाणीव आहे, तर ४६ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील ८६ टक्के कर्मचारी याचे महत्त्व जाणतात. लहान आकाराच्या कंपन्यांमध्ये याबाबत अधिक जागरुकता दिसून आली.

रोजगार क्षेत्रातील नवे कल
घरून किंवा कुठूनही काम करण्याच्या सुविधेमुळे पारंपरिक कामाच्या पद्धतींमध्ये बदल होत आहेत. कंपन्या वाढत्या प्रमाणात अशी लवचिक व्यवस्था स्वीकारत आहेत, त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल सुधारत आहे.
केवळ सामाजिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर नवोन्मेष आणि कार्यक्षमतेला चालना देण्याच्यादृष्टिने कंपन्या पूरक धोरणे राबवत आहेत. डिजिटल कौशल्ये आणि अन्य कौशल्यविकासावर अधिक भर दिला जात आहे. डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर सुरक्षा आदी कौशल्यांची मागणी वाढत आहे.
‘‘कंपन्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत असून, त्यासाठी कामाच्या पद्धतीतही बदल करत आहेत. काम आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलनाचे महत्त्व ओळखून अनुकूल पद्धती अवलंबत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.परिणामी उत्पादकता आणि शाश्वत वाढीलादेखील चालना मिळत आहे. या बदलांमुळे कंपन्या आणि कर्मचारी दोघांचीही उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होऊ शकते.’’
- सोनल अरोरा, व्यवस्थापक, जी आय ग्रुप होल्डिंग इंडिया.