esakal | शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."
sakal

बोलून बातमी शोधा

शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले होते. काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त करुन पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले कॅप्टन थेट अमित शहांच्या घरी जात आहेत, या बातमीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या दोघांमधील भेटीनंतर पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपासून अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची अशीच ठरणार आहे. मात्र, ही भेट नेमकी त्याच कारणासाठी आहे का, याबाबतचा खुलासा आता खुद्द अमरिंदर सिंग यांनीच केला आहे.

अमरिंदर सिंग यांनी म्हटलंय की, "आज मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. शेतकरी कायद्यांविरोधात दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा केली तसेच पीक विविधीकरणात पंजाबला पाठिंबा देण्याबरोबरच कायदे रद्द करून आणि एमएसपीची हमी देऊन हे संकट तातडीने सोडवण्याची त्यांना विनंती केली आहे." अशी माहिती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कालच नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता. त्याचवेळी अमरिंदर सिंग हे अमित शहा यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे काल दिवसभर पंजाब देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.

loading image
go to top