
Joshimath : जोशीमठमधून अडीचशे कुटुंबाचे स्थलांतर
डेहराडून : उत्तराखंडमध्ये खचलेल्या जोशीमठमधील धोकादायक इमारती पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरूच आहे. आज जेसीबीच्या मदतीने बांधकाम खात्याचे विश्रामगृह पाडण्यात आले. तसेच हॉटेलही काढण्यात आले.
आतापर्यंत या भागातील ८४९ इमारतींना तडे गेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सुमारे अडीचशे कुटुंबाचे स्थलांतर झाले आहे. मात्र मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जोशीमठमधील ६० ते ७५ टक्के लोकांचे जनजीवन सुरळीत असल्याचे म्हटले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काल गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांनी गृहमंत्र्यांना जाेशीमठ येथील स्थितीची माहिती दिली. ही बैठक गृहमंत्रालयात सुमारे अर्धा तास चालली.
जोशीमठ येथील स्थलांतरित नागरिकांना नव्या भागात नेण्यात येत असून त्यासंदर्भातील माहिती देण्यात आली. बैठकीनंतर धामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की जोशीमठ येथील ६५ ते ७० टक्के लोक सामान्यपणे काम करत आहेत.
मात्र काही जण जोशीमठबाबत अफवा पसरवत आहेत. अशा प्रकारच्या अफवा देशासाठी चांगल्या नाहीत. उत्तराखंडचे पयर्टन स्थळ औली येथे नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. येत्या तीन चार महिन्यांत चार धाम यात्रा सुरू होईल.
गृहमंत्र्यांनी आपल्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही ते म्हणाले. जोशीमठसंदर्भात गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला आहे का? असे विचारले असता धामी यांनी जेव्हा अंतिम अहवाल येईल, तेव्हाच केंद्राला दिला जाईल, असे नमूद केले.
प्रत्येकी दीड लाखांची मदत करणार
जोशीमठ येथे ८४९ घरांना तडे गेले आहेत. या रहिवाशांना प्रत्येकी दीड लाखांची मदत करण्यात येत आहे. ५० हजार रुपये शिफ्टिंगसाठी आणि भरपाई म्हणून एक लाख रुपये दिले जाणार आहेत. भरपाईची एकूण रक्कम निश्चिती नंतर केली जाईल. आतापर्यंत अडीचशे कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
त्यांच्यासाठी ६१५ खोल्यांचे तात्पुरते निवारागृहे उभारले आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना सुविधा दिल्या जात आहेत, असे धामी म्हणाले.दरम्यान, जोशीमठ येथील धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. यात काही सरकारी इमारतीचा देखील समावेश आहे.