४५ वर्षांच्या गुलामीचं हेच फळ का? ओवैसींचा गुलाम नबी आझादांवर निशाणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

काँग्रेस पक्षातील गांधी परिवार आणि अन्य नेत्यांमधील लढाई समोर आली आहे

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षातील गांधी परिवार आणि अन्य नेत्यांमधील लढाई समोर आली आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या मागे भाजपचा हात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. त्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नाराजी व्यक्त करत राजीनाम्याची तयारी दाखवली होती. यावरुन खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जे आरोप आझाद माझ्यावर करत होते, आज त्यांच्यावर तेच आरोप होत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Congress Crises Live : राहुल गांधींवर नाराजी, गुलाम नबी आझादही राजीनाम्याच्या...

एमआयएम खासदार यांनी ट्विट केलं आहे. आदर्श न्याय, गुलाम नबी आझाद माझ्यावर असेच आरोप लावायचे, आज त्यांच्यावर तेच आरोप आगले आहेत. ४५ वर्षांची गुलामी याच्यासाठी? जानवेधारी नेतृत्वाचा विरोध करणाऱ्याला बी-टीमच म्हटलं जाईल, हे सिद्ध झाले. मला आशा आहे की मुस्लीम समुदायाला आता कळेल की काँग्रेससोबत राहिल्याने काय होते, असं ओवैसी म्हणाले आहेत.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पत्र लिहिलेल्या नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्र लिहिण्याच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केले होते. सोनिया गांधी आजारी असताना पत्र लिहिण्यात आले. शिवाय पक्ष सध्या संकटात आहे, अशावेळी काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहिले आहे. त्यामुळे यामागे भाजपचा हात आहे का, अशी शंका येते, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. कपिल सिब्बल यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनतर सिब्बल यांनी आपलं ट्विट मागे घेतले आहे. 

राहुल गांधींवर आरोप करणारे ट्विट घेतले मागे; कपिल सिब्बल यांचा खुलासा

काँग्रेसने राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल गांधी यांनी तशाप्रकारचं वक्तव्य केलं नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. गुलाम नबी आझाद यांनीही आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. राजीनाम्याचं वक्तव्य मी वेगळ्या संदर्भात केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पत्र लिहिण्यामागे भाजपचा हात असल्याचं सिद्ध झालं, तर मी राजीनामा देईन, असं मी म्हणालो होतो. पण राहुल गांधी यांनी माझ्याविरोधात कोणताही वक्तव्य केलं नाही, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब फुटला आहे. २० पेक्षा अधिक काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहित पूर्णवेळ आणि सक्रीय अध्यक्षाची मागणी केली आहे. पत्रात नेत्यांनी गांधी घराण्यावर थेट टीका केली नाही. सोनिया गांधी यांनी पदावरुन पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. तसेच नवीन अध्यक्ष निवडण्यास सांगितलं आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mim asasuddina owaisi criticize congress gulam nabi aazad