
ही खूप चांगली सुरुवात आहे. द्रमुकनं देशाच्या एकात्मतेसाठी मोठं काम केलं आहे.
PM मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधक 'हा' तगडा उमेदवार उतरवणार मैदानात; अब्दुल्लांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी स्टॅलिन यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. मात्र, यावर स्टॅलिन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त द्रमुकनं आज संध्याकाळी चेन्नईमध्ये एक विशाल रॅली आयोजित केलीये. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, ही खूप चांगली सुरुवात आहे. द्रमुकनं देशाच्या एकात्मतेसाठी मोठं काम केलं आहे. त्याचवेळी अब्दुल्ला यांना एमके स्टॅलिन यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'का नाही? ते पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? त्यात चुकीचं काय आहे?' स्टॅलिन पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जगदीप धनखर यांनी एक पत्र लिहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करून स्टॅलिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही स्टॅलिन यांना शुभेच्छा दिल्या.