जम्मू काश्मीरच्या काही भागातील इंटरनेट सेवा पुन्हा स्थगित

वृत्तसंस्था
Wednesday, 6 May 2020

लष्करी जवानांनी 'हिज्बूल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेच्या काही दहशतवाद्यांना घेरले असून या मोहिमेदरम्यान जम्मू काश्मीरच्या काही भागातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

जगभरात कोरोनाचे संकट असताना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यात कर्नल-मेजर यांच्यासह 8 जवान शहिद झाल्यानंतर लष्कराने याठिकाणी दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहिम सुरु केली आहे . बुधवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरामधील बेगपोरा परिसरात लष्करी जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त आहे. लष्करी जवानांनी 'हिज्बूल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेच्या काही दहशतवाद्यांना घेरले असून या मोहिमेदरम्यान जम्मू काश्मीरच्या काही भागातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने घेराव घातलेल्या दहशतवाद्यांमध्ये 'हिज्बूल मुजाहिद्दीन'चा प्रमुख रियाज नायकूचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाचे अतिरिक्त तुकडी देखील तैनात करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस, लष्करी जवान आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त तुकडीने मंगळवारी रात्री उशीरापासूनच बेगपोरा परिसरात शोध मोहिमेला सुरुवात केली होती. या परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रतिउत्तरादाखल जवानांनी गोळीबार केल्याचे समजते. मागील आठ तासांत अवंतीपूरा परिसरातील लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दुसऱ्यांदा गोळीबारी झाल्याची घटना आहे.  बुधवारी सकाळी लष्करांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचेही वृत्त आहे. मंगळवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांना एका ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर लष्कराने रात्रीपासून शोध मोहिम हाती घेत दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. 

केंद्र सरकारने कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवेवर निर्बंध घालण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीला काश्मीर खोऱ्यात 2G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली होती. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कुरापतींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने याठिकाणी 4G इंटरनेट सेवेवर निर्बंध घातले आहेत. 

यासंदर्भात मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती. कोरोनाच्या संकटात आपत्कालीन सेवा उपलब्ध करणे, डॉक्टरांकडून व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला घेणे यासाठी सध्याच्या घडीला काश्मीर खोऱ्यात 4G इंटरनेट सेवा बहाल करण्यात यावी, असा युक्तीवाद याचिकाकर्त्याच्या वकीलांनी केला होता. इंटरनेट सेवा सुरु केल्यास काश्मीर खोऱ्यातील दहशतीचे वातावरण आणखी बिघडेल, अशी बाजू राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आली होती. इंटरनेट सेवेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाच आता पुन्हा एकदा काही भागातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Internet services in Kashmir suspended due to terrorist  trapped underway in south Kashmir