New Delhi : ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banerjee narndra modi
ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील व्यावसायिक गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सात वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले. मोदी यांनीही ते स्वीकारून बंगालला जाण्यास होकार दर्शविला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता यांचा भाजपशी संघर्ष झाला होता. आता भाजप तसेच काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांना तृणमूल काँग्रेसने दरवाजे उघडले आहेत. या पार्श्वभूमीवर ममता यांनी समेटाचा संकेत देत पंतप्रधानांना दिलेले निमंत्रण महत्त्वाचे मानले जात आहे. तर, पंतप्रधानांनीही या निमंत्रणाचा स्वीकार करून बंगालला जाण्यास होकार दिला आहे. या भेटी दरम्यान राजकीय मतभेद आणि पक्षीय विचारसरणीचा केंद्र आणि राज्यांच्या संबंधांवर परिणाम होऊ नये, राज्याचा विकास झाला तरच केंद्राचा विकास होतो, असे पंतप्रधानांना सांगितल्याचे ममता यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

या भेटीदरम्यान ममता यांनी आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र ५० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्राने मागे घ्यावा, अशी मागणी केली, तसेच त्रिपुरातील दंगलीचा मुद्दाही उपस्थित केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप विरोधात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मदत मागितल्यास आपला मदतीचा हात पुढे असेल अशीही टिप्पणी त्यांनी केली.

या भेटीआधी ममता यांना राष्ट्रीय राजकारणातील बंडखोर चेहरा मानले जाणारे आणि सध्या भाजपचे खासदार असलेले डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचीही भेट घेऊन चर्चा केली. डॉ. स्वामी यांची राज्यसभेची खासदारकी येत्या काही महिन्यांत संपुष्टात येणार आहे. आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका मोदींना सातत्याने लक्ष्य करणारी राहिली आहे. कालच काँग्रेसमधून अशोक तंवर, कीर्ती आझाद तसेच संयुक्त जनता दलातून पवन वर्मा यांचे ममतांनी तृणमूलमध्ये स्वागत केले होते.

महाराष्ट्रातही जाणार
दिल्ली दौऱ्यानंतर ममता पुढील महिन्यात मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही भेटणार आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. त्यांना समिटचे निमंत्रण देण्यासाठी जाणार असल्याचे ममता म्हणाल्या.

सोनियांची भेट बंधनकारक नाही

दिल्लीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या ममता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही भेटणार असल्याची चर्चा होती. परंतु पंतप्रधानांच्या भेटीनंतर त्यांनी तशी शक्यता धुडकावून लावली. एवढेच
नव्हे तर प्रत्येक वेळी सोनियांना भेटणे गरजेचे आहे का? अशा भेटीचे घटनात्मक बंधन नाही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

loading image
go to top