मोदींकडून नितीशकुमारांची तोंडभरून स्तुती

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

दारूविरुद्ध उभारलेल्या लढ्याबद्दल मी नितीशकुमारांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र एकट्या नितीशकुमार तसेच त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नाने दारूबंदी यशस्वी होणार नाही. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दारूबंदी यशस्वी करण्यासाठी याला जनआंदोलन बनवायला पाहिजे

पाटणा - दारूबंदीच्या निर्णयबाद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे तोंडभरून कौतुक केले. सर्वांनी पाठिंबा देऊन दारूबंदीचा हा निर्णय यशस्वी करावा, असे आवाहनही मोदी यांनी सर्वांना केले.

नोटाबंदीला पाठिंबा दिल्याबद्दल गेल्याच आठवड्यात त्यांनी नितीशकुमार यांची स्तुती केली होती. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या 350 व्या प्रकाश पर्वानिमित्त आज येथे आयोजित कार्यक्रमात मोदी, नितीशकुमार एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, ""दारूविरुद्ध उभारलेल्या लढ्याबद्दल मी नितीशकुमारांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र एकट्या नितीशकुमार तसेच त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नाने दारूबंदी यशस्वी होणार नाही. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दारूबंदी यशस्वी करण्यासाठी याला जनआंदोलन बनवायला पाहिजे. दारूबंदीच्या यशस्वी अंमलबजावणीतून बिहार देशापुढे चांगले उदाहरण बनू शकेल.''

तत्पूर्वी नितीशकुमार यांनी आपल्या भाषणात दारूबंदी देशभर न्यावी, असे आवाहन मोदी यांना केले होते. त्याला मोदी यांनी आपल्या भाषणात "हा' असा प्रतिसाद दिला.

मोदी पुढे म्हणाले, ""या प्रकाशपर्वामुळे एकता, बंधुभाव, सर्व धर्मांचा आदर आणि सामाजिक सलोख्याचा संदेश जगभर पोचेल. मानवी मूल्यांची जोपसना करण्याचा संदेशही यातून जाणार आहे. प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटींची तरतूद केली आहे. तर यानिमित्त रेल्वे चाळीस कोटी खर्चून येथे पूल बांधणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमांसाठी आणखी चाळीस कोटींची जादा तरतूद केली जाणार आहे.''

मोदी आणि नितीशकुमार हे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांची ही स्तुतीसुमने महत्त्वाची मानली जातात. काही दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले होते.

या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीयमंत्री रामविलास पासवान, रवीशंकर प्रसाद हेसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव समोर उपस्थितांमध्ये बसले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi praises Nitish Kumar for prohibition