
मोदींनी देशाचे रक्षण करावे; चीनबाबत राहुल गांधी यांची केंद्रावर टीका
नवी दिल्ली : सीमावादावरून भारत आणि चीनचे संबंध ताणले गेले असताना लडाख सीमेवरील पॅंगाँग त्सो सरोवरावर चीनी सेना दुसरा पूल बांधत असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर प्रहार केला आहे. देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको, पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले आहे.चीनी सेना दुसरा पूल बांधत असल्याची उपग्रहाद्वारे घेण्यात आलेली छायाचित्रे समोर आली आहेत.
याविषयी संरक्षण मंत्रालय अधिक भाष्य करू शकेल असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. त्यावर राहुल यांनी ट्विट करून मोदी सरकारवर हल्ला चढवला. ‘चीन पॅंगाँग त्सो सरोवरावर पहिला पूल बांधत असताना, या स्थितीवर लक्ष असल्याची भारत सरकारची प्रतिक्रिया होती. चीन दुसरा पूल बांधत असतानाही भारत सरकार स्थितीवर लक्ष असल्याचे म्हणत आहे. भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही,‘ असे राहुल यांनी म्हटले असून, ‘डरपोक आणि मवाळ उत्तर उपयोगाचे नाही. पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
दरम्यान,काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या विधानाची चित्रफीत दाखवून सरकारवर टीकास्त्र सोडले. मुत्सद्देगिरीमध्ये शब्दांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्या भूभागावर चीनचा ताबा असल्याचे जाणवते आहे, असे म्हटले होते. प्रत्यक्षात तेथे चीनचा कब्जा असून ही राष्ट्रीय भूमिका आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी, कोणी घुसखोरी केली नव्हती आणि कोणी घुसखोरी केलेली नाही अशी क्लिनचीट (चीनला) दिली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्याने कालच्या भारताची भूमिका दुबळी केली आहे. पुलाची निर्मिती म्हणजे चीनने युद्धविरामाचे उल्लंघन केले असल्याचाही दावा पवन खेडा यांनी केला.
नड्डा यांना प्रत्त्युत्तर
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर केलेल्या घराणेशाहीच्या आरोपांची पवन खेडा यांनी खिल्ली उडवली. ‘ज्योतिरादित्य शिंदे किंवा अनुराग ठाकूर यांच्यावर ते (नड्डा) का जाहीरपणे हल्ला करत आहेत,‘ असा खोचक सवालही त्यांनी केला. राजनाथसिंह यांचे पुत्र पंकज यांच्याबद्दल देशाला उत्सुकता आहे. तेथे (भाजपमध्ये) घराणेशाहीतून आलेले ४५ जण आहेत. त्यांच्याविरुद्ध असे जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. कदाचित, त्यांचा इशारा अमित शाह यांचे पुत्र आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडे असावा, अशी कोपरखळीही खेडा यांनी मारली.
Web Title: Modi Should Protect Country Rahul Gandhi Criticism Regarding China
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..