विधानसभेच्या विजयासाठी ‘मोदी व्हिजन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधानसभेच्या विजयासाठी ‘मोदी व्हिजन’

विधानसभेच्या विजयासाठी ‘मोदी व्हिजन’

sakal_logo
By
मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : कोरोना काळामुळे दीड वर्षांनी राजधानी दिल्लीत नुकत्याच प्रत्यक्ष पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विधानसभा निवडणुकांत विजय कसा मिळवावा, याचेच व्हीजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षनेत्यांसमोर ठेवले. पश्चिम बंगाल व पंजाब या पक्षाच्या विजयरथात अडथळे ठरलेल्या व ठरू शकणाऱ्या दोन राज्यांवर भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व खास लक्ष केंद्रित करणार असल्याचेही यावेळी झालेल्या मंथनातून स्पष्ट झाले. महाराष्ट्रासारख्या राज्यात पुन्हा सत्तावापसी करा व तेथील सरकार पडायला हवे, इतका स्पष्ट मेसेज दिल्ली दरबारातून दिला गेला. राज्याची मंगळवारी होणारी कार्यकारिणी त्यावर किती जोरकस प्रतिसाद देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

बंगालमध्ये भाजप नवकथा लिहिणार आहे, असा संकल्प सोडून तेथील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कायम ठेवण्यावर पक्षाचा जोर असल्याचेही स्पष्ट झाले. प. बंगाल, दक्षिण भारत व ईशान्येकडील राज्ये अजून मोदी- शहा यांच्या अश्वमेधाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असल्याचा मेसेज पुन्हा दिला गेला. दक्षिण भारतही पक्ष विसरलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे विजयाचे स्वप्न ममता बॅनर्जी यांनी एकहाती उधळून लावले. त्यानंतरचा हिंसाचार व निवडणुका झाल्यावर पक्षनेते आम्हाला वणव्यात सोडून दिल्लीत जाऊन बसले या तेथील केडरमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या भावनेला थोपविण्याचा संदेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या माध्यमातून दिला गेला. बंगालमध्ये २०१० मध्ये भाजपची मतांची टक्केवारी नगण्य असताना, गेल्या निवडणुकीत ३८ टक्के मते मिळवून पक्षाने लोकसभेत तर तृणमूल, डाव्यांच्या गडाला हादरे दिलेच पण विधानसभेत ७७ जागाही जिंकल्या, असे सांगून नड्डा यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात राज्यात पक्षाचे ५३ कार्यकर्ते मारले गेले व लाखभर लोकांना विस्थापित व्हावे लागले याचे स्मरण करून दिले.

सत्ताधाऱ्यांच्या या हिंसाचाराविरुद्ध व तेथे राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी भाजप लोकशाही मार्गाने लढेल आणि (राज्य सरकारच्या) अराजकाला उत्तर देईल असे बजावून ममता सरकारला एक अव्यक्त संदेशही दिल्लीतून दिला गेला आहे. त्याचबरोबर गोवा व अन्य राज्यांत ममता यांनी जी धडक दिली आहे ती थोपविण्यासाठीचा संदेशही मोदींनी गोव्यातील भाजप केडरला दिला. शेतकरी आंदोलनानंतर पंजाबमध्येही भाजप बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे ते बदलण्याचा निर्धार मोदी-शहा यांनी केल्याचे दिसले. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कथित बी टीम मदतीला घेऊन भाजप या राज्यातही जोरदार मुसंडी मारण्याचे स्वप्न पहात आहे.

सेवा ही संकल्प !

पंतप्रधान मोदी यांनी बैठकीच्या समारोपाला पन्नास मिनिटे भाषण केले त्यात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना जनतेशी जोडून राहण्याचे आवाहन केले. जनतेत राहून, जनतेचे प्रश्न समजावून घेऊन आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करून कार्यकर्त्यांनी जनसेवा करावी असे विचार पंतप्रधानांनी मांडले. पाच राज्यांच्या निवडणूक विजयासाठी पंतप्रधानांनी दिला. मात्र त्यातील तपशील बाहेर येणार नाहीत याची काळजी भाजपने घेतली.

योगी.. योगी चे संकेत!

दिल्ली बैठकीच्या उत्तरार्धात उत्तर प्रदेशासह पाचही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व योगी आदित्यनाथांसह चार मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपच्या स्थितीची माहिती देणारी सादरीकरण केली. यापैकी फक्त योगी यांनाच दिल्लीत बोलाविलेले होते. त्यांनी राजकीय ठराव मांडून २० मिनिटे जोरदार भाषण केले.

loading image
go to top