मोदींचा भारत, डार्विनचा सिद्धांत अन् सद्यःस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींचा भारत, डार्विनचा सिद्धांत अन् सद्यःस्थिती
मोदींचा भारत, डार्विनचा सिद्धांत अन् सद्यःस्थिती

मोदींचा भारत, डार्विनचा सिद्धांत अन् सद्यःस्थिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- टी. एन. नैनन

कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्याने समाजाविरुद्ध संघर्ष छेडण्याचा आदेश पोलिसांना देण्याची दुसरी कोणती घटना स्वातंत्र्योत्तर काळात घडल्याचा विचार करणे अवघड आहे. यास इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या काळाचा एकमेव अपवाद असेल. याहीपुढे जाऊन आणीबाणीच्या काळातही पोशाखावर चार स्टार असलेल्या, शिस्त नसानसात भिनलेल्या जनरलने झुंडबळीचे स्वागत केल्याचा विचार करणे आणखी अवघड आहे. झुंडीने एखाद्याला दहशतवादी ठरविणे आणि त्याचा बळी घेणे असा याचा संदर्भ आहे. अशी विधाने पूर्णतः गांभीर्याने केली जाणे हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतामध्ये झालेला एक बदल आहे.

भारताला आक्रमक तसेच इतरांनी केलेल्या हिंसाचाराचा प्रदीर्घ इतिहास आहे. स्वातंत्र्य लढ्याचे वैशिष्ट्य ठरलेल्या अहिंसक पद्धतीमुळे तो झाकला गेला होता, पण अशा हत्यांमुळे हिंसाचाराने टोक गाठले. दलितांविरुद्ध पद्धतशीर हिंसाचार झाला. हिंसक घटनांच्या मालिकाही घडल्या. दुसरीकडे दुर्बल आदिवासींना त्यांच्या पारंपरिक अधिवासातून सामुहिक पातळीवर विस्थापित करण्यासाठीही हिंसेचाच वापर झाला. याशिवाय आज अर्थव्यवस्थेच्या अनौपचारिक क्षेत्रातील लाखो नोकऱ्या क्रूर पद्धतीने नष्ट केल्या जाण्याचा प्रकार सर्रास घडतो आहे. मात्र हा सुद्धा अशा मतप्रवाहाचा विजय मानून जल्लोष केला जातो.

बहुतांश समाजामध्ये हिंसा ही नेहमीच बलाढ्याकडून दुर्बलाविरुद्ध, गणवेशातील व्यक्तींकडून फाटके कपडे घातलेल्यांविरुद्ध, बहुसंख्याक समुदायाकडून कोणत्याही प्रकारच्या अल्पसंख्य समुदायाविरुद्ध होते. यात सरकार एक तर कारणीभूत असते किंवा बघ्याच्या भूमिकेत असते. भाष्य करण्याच्या पद्धतीत सांगायचे झाल्यास याचा परिणाम डार्विनच्या उत्क्रांतीवादासारखा असतो. उत्क्रांतीवाद म्हणजे थोडक्यात हेच की जो बलाढ्य त्याचेच अस्तित्व टिकणार अर्थात बळी तो कान पिळी! याचा उल्लेख चपखल शब्दांत करायचा झाल्यास हिंदीतील एक म्हण आठवते. जिसकी लाठी उसकी भैंस...ज्याच्या हातात काठी तोच म्हशीचा मालक असा याचा अर्थ आहे.

या पार्श्वभूमीवर ब्रायन हेअर-वॅनेसा वूड््स या पती-पत्नीच्या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. सर्व्हायव्हल ऑफ द फ्रेंडलीएस्ट ः अंडरस्टँडींग अवर ओरीजीन्स अँड रिडीस्कव्हरींग अवर कॉमन ह्युमॅनिटी असे पुस्तकाचे नाव आहे. उत्क्रांतीवादातील व्याख्येला समांतर असा सिद्धांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे. हे लेखक म्हणतात की डार्विन सिद्धांतातील अस्तित्वाकडे मित्रत्त्व आणि सहकार्याच्या वर्तनाची क्षमता यादृष्टीने पाहिले पाहिजे.

याच गुणांमुळे आधुनिक मानव उत्क्रांतीमधील आपल्या नजीकच्या सहचरांच्या तुलनेत प्रगती आणि भरभराट करू शकला. कॉर्पोरेट संस्कृती, क्रिकेट संघ आणि व्यक्तींप्रमाणेच समाजातही हेच दिसून येते. प्राण्यांच्या बाबतीतही हे लागू होते. हेअर-वुड््स यांनी त्यांच्या आधीच्या प्रसिद्ध पुस्तकात हेच म्हटले आहे. द जिनीयस ऑफ डॉग्ज ः हाऊ डॉग्ज आर स्मार्टर दॅन यू थिंक या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, श्वानांचे माणसांबरोबरील मित्रत्व म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचा आविष्कारच होय.

या सर्व बाबी अशा भारतात प्रस्तुत ठरल्या आहेत, जेथे द्वेषमूलक भाषणे झोडली जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विशिष्ट समुदायाविरुद्ध एका अर्थाने वैध म्हणता येईल असा हिंसाचार होतो आहे. रस्त्यावरही हिंसक घटना घडतात. लोक एका विशिष्ट प्रकारचेच अन्न खातात आणि त्याविरुद्ध प्रतिकार करणे किंवा दुमत दर्शविणे अशक्य ठरते. या बाबी आणखी एका कारणामुळे प्रस्तुत ठरतात. सहकार्याच्या वर्तनाला एक काळी बाजू सुद्धा असते. असे लोक गटामध्ये एकत्र होऊन वंचितांविरुद्ध आक्रमण करतात. मिसिसिपी बर्निंग या चित्रपटात हाच धडा देण्यात आला आहे.

अशा हिंसाचाराच्या बाबतीत नेहमीच एक निर्णायक दिवस उजाडणार असतो. प्रामुख्याने संस्थात्मक अथवा नैतिक अधःपतनाची हिंसेला जोड मिळाली असेल तर समाजाची घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटलेली असते. यासाठी अमेरिकेचे उदाहरण देता येईल. तेथील समाज हा काही सुदृढ किंवा सुरक्षित नाही. लोकसंख्येच्या तुलनेत तुरुंगात सर्वाधिक लोक त्या देशात आहेत. तुरुंगातील व्यक्तींमध्ये श्वेतवर्णीय नसलेल्यांचे प्रमाण विषम आहे.

काही वेळा एकाच विशिष्ट दिशेने जाईल अशी दंगल अनपेक्षित बाजूंना भरकटू शकते आणि स्फोटक ठरू शकते. मनमोहन सिंग यांनी मूलतः आदिवासी असलेल्या माओवाद्यांचे बंड ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेतील सर्वांत मोठी समस्या असल्याचे म्हटले होते. आपण लागू केलेल्या कायद्याखाली आपल्यालाच कधी काळी तुरुंगात किंवा नजरकैदेत जावे लागेल असे काश्मीरमधील अब्दुल्ला घराण्याला कदापी वाटले नव्हते. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनधिकृत कारवाया प्रतिबंध कायद्याचा (यूएपीए) संदर्भ द्यावा लागेल. काँग्रेसने कायद्याच्या पुस्तकात या कायद्याची कलमे लिहिली तेव्हा त्याची व्याप्ती वाढेल, अवैध कारवायांच्या व्याख्येचा विस्तार होईल अशी कल्पनाही त्यांना नव्हती. मुळात जो कायदाहीन कायदा आहे त्याच्या अंतर्गत कारवाई करू शकतील अशा अधिकाऱ्यांचे प्रकारही वाढले आहेत.

खरोखरच हे अगदी सोपे आहे. समृद्ध आणि वंचित यांच्यातील दरी दूर करून मुक्त समाजातील सर्व लोक मित्रत्वाने वागू लागले तर तशा सहकार्याच्या एकजिनसीपणाची फळे चांगली असतात. सोईस्कर अपवादात्मक वर्तनाकडे झुकलेल्या गटांचे प्रमाण वाढले, झुंडबळी, उद्दाम संघर्ष वाढल्यास संस्थात्मक तटबंदी भक्कम झाली पाहिजे. जे बलाढ्य आहेत ते नव्हे तर जे मित्रत्वाने वागतात त्यांचे अस्तित्व टिकण्याची दक्षता घेतली जाणे महत्त्वाचे ठरते.

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद : मुकुंद पोतदार)

loading image
go to top