
मोहम्मद जुबेरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; दिला हा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेरला (Mohammed Zubair) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला बुधवारपर्यंत (ता. २०) त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या पाच प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई करू नये, असे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद जुबेरच्या अर्जावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. (Mohammed Zubair Latest Marathi News)
मोहम्मद जुबेरने (Mohammed Zubair) उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या सहा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणांमध्ये झुबेरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. धार्मिक भावना भडकावणे, न्यूज अँकरवर टिप्पणी करणे, हिंदू देवतांवर अपमानास्पद टिप्पणी करणे, प्रक्षोभक पोस्ट शेअर करणे यासाठी या एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत.
मोहम्मद झुबेरच्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेश सरकारला नोटीसही बजावली आहे. ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापकावर हातरसविरुद्ध दोन, तर गाझियाबाद, मुझफ्फरनगर, लखीमपूर खेरी आणि सीतापूर येथे प्रत्येकी एक गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अंतरिम जामीन मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
तत्पूर्वी, सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या खंडपीठाने मोहम्मद झुबेरच्या वकील वृंदा ग्रोव्हरच्या निवेदनाची दखल घेतली. त्यात तथ्य तपासणारे आणि पत्रकाराविरुद्ध नोंदवलेले विविध एफआयआर लक्षात घेऊन तातडीची सुनावणी घेण्याचे सांगितले होते. मोहम्मद जुबेरला गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्याला जामीन मिळाला. मात्र, धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये विविध एफआयआर दाखल झाल्यामुळे त्याला तुरुंगात राहावे लागले.
Web Title: Mohammed Zubair Supreme Court Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..