'इस्रो'च्या शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गुढ उकलले; यानेच केली हत्या

वृत्तसंस्था
Saturday, 5 October 2019

सुरेश हे मंगळवारी (ता. 1) त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर तपासात त्यांच्या गे पार्टनरने पैशाच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले आहे. तो लॅब टेक्निशियन असल्याचे सांगण्यात येत आहे.

हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर'शी (एनआरएससी) संबंधित शास्त्रज्ञ एस. सुरेश (वय 56) यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, पैशाच्या वादातून गे पार्टनरनेच त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. 

सुरेश हे मंगळवारी (ता. 1) त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर तपासात त्यांच्या गे पार्टनरने पैशाच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले आहे. तो लॅब टेक्निशियन असल्याचे सांगण्यात येत आहे.

मूळचे केरळचे असलेले सुरेश यांचा हैदराबादच्या मध्यवस्तीत अमीरपेठ येथील अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये प्लॅट आहे. तेथे ते एकटेच राहत होते. ते कार्यालयात गेले नसल्याने त्यांच्या सहकाऱ्याने मोबाईल फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. पण, पलिकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने सुरेश यांची पत्नी इंदिरा यांना याबाबत सांगितले. इंदिरा या चेन्नईत बॅंक कर्मचारी आहेत. त्या पूर्वी त्याच इमारतीत राहणाऱ्या सुरेश यांच्या नातेवाइकांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. इंदिरा हैदराबादला पोचल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर सुरेश मृतावस्थेत आढळले होते. 

सुरेश यांच्या डोक्‍यावर वजनदार वस्तूने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सुरेश यांच्या डोक्‍यावर जखमा आढळल्या आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून अथवा सुरेश यांना ओळखणाऱ्याचे हे कृत्य असावे, याचा तपास सुरू होता. अखेर पोलिसांनी त्यांच्या गे पार्टनरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money Dispute over Sexual Relations with Male Lab Technician Led to ISRO Scientists Murder