
India Monkeypox Update : भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढताना दिसून येत असतानाचा केरळमध्ये अवघ्या आठ दिवसांमध्ये या विषाणुची लागण होणाऱ्या तिसऱ्या रूग्णाची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. लागण झालेली व्यक्ती संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आल्याचे वृत्त आहे. सध्या या रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 35 वर्षीय व्यक्तीमध्ये या विषाणुची पुष्टी झाली आहे. ही व्यक्ती संयुक्त अरब अमिरातीहून मलप्पुरम येथे परतली होती. 13 जुलै रोजी ताप आल्याने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 15 जुलैपासून मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
या विषाणुच्या पहिल्या रूग्णाची नोंद केरळमध्ये 14 जुलै रोजी करण्यात आली होती. यानंतर 18 जुलै रोजी देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला होता. आता पुन्हा केरळमध्येच तिसरा रूग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.