Monsoon 2022 : कसा असेल यंदाचा पाऊस? 'स्कायमेट'चा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon Prediction 2022 Skymet

Monsoon 2022 : कसा असेल यंदाचा पाऊस? 'स्कायमेट'चा अंदाज

यंदाच्या मोसमी पावसाचे दुसरे पुर्वानुमान स्कायमेटने जाहीर केले आहे. यानुसार यंदाचा पाऊस सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पाऊस यंदा देशभरात अपेक्षित आहे. (Skymet Monsoon Prediction 2022)

जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८८०.६ मिमी आहे. दरवर्षी या आकडेवारीशी तुलना करून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. यंदाचा मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के इतका बरसणार आहे.

स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या गेल्या दोन ऋतूंवर ला निनाचा प्रभाव दिसून आला आहे. तत्पूर्वी ला निनाचा प्रभाव हिवाळ्याच्या ऋतूत वेगाने घटत असे; मात्र पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती अधिक असल्याने ला निनाचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया थांबली आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपर्यंत ला निनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल निनोची शक्यता नाही.

देशभरातील पाऊस सरासरीइतका होणार असला तरीही राजस्थान, गुजरात आणि ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे या मोसमात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य महिन्यांमध्ये पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्यक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील.

ला निना आणि अल निनो म्हणजे काय ? प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील पृष्ठभागाचे तापमान अधिक असते, अशा स्थितीला 'अल निनो' म्हणतात. अशावेळी भारतात पाऊस कमी पडतो. याउलट, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील पृष्ठभागाचे तापमान अधिक असते, अशा स्थितीला 'ला निना' म्हणतात. अशावेळी भारतात पाऊस अधिक पडतो.

Web Title: Monsoon 2022 Prediction Skymet Weather Forecast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top