
पुणे : यंदा मॉन्सूनने वेळेपेक्षा पाच दिवस आधीच आपला प्रवास सुरू केला आहे. नैर्ऋत्येकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी (दक्षिण-पश्चिम मॉन्सून) आज, मंगळवारी (१३ मे) अंदमान बेटांवर धडक दिली. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांमध्ये मॉन्सूनचा प्रवेश झाला असून, लवकरच हा मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवरही पोहोचू शकतो.
गेल्या २४ तासांत निकोबार बेटांवर मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांतही पावसाचे हे स्वरूप कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदमान क्षेत्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे १.५ ते ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत हे वारे प्रभावी असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. ढगांची वाढती गर्दी, वातावरणातील आर्द्रता आणि बदलते तापमान यांवरून मॉन्सूनचे आगमन निश्चित मानले जात आहे.