साध्वी प्रज्ञासिंह पुन्हा अडकणार? 'हा' खटला नव्याने उघडणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

- प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे. 

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह यांच्याविरोधात यापूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा याचिका दाखल केली. याबाबत भोपाळचे कायदामंत्री पी. सी. शर्मा यांनी सांगितले, की प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नुथराम गोडसे याला देशभक्त म्हटले होते. तर हुतात्मा हेमंत करकरे यांना देशद्रोही म्हटले होते. त्यानंतर आता सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा तपास व्हायला हवा, असे सांगितले होते. त्यानुसार या प्रकरणाची फाईल्स मागितल्या आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन उच्च न्यायालयात याबाबत पुन्हा एकदा याचिका दाखल करणार आहोत. 

दरम्यान, 2017 मध्ये सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना कनिष्ठ न्यायालयातून निर्दोषमुक्त करण्यात आले होते. यामध्ये प्रज्ञासिंह यांचाही समावेश होता. त्यावेळी या सर्वांना पुराव्यांअभावी निर्दोषमुक्त केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Government to reopen sunil joshi murder case file and case against pragya singh thakur