महाराष्ट्रावरील संकट लवकर टळावे म्हणून आपण ११ वेळा हनुमान चालीसाचे पठण केले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navneet rana

महाराष्ट्रावरील संकट लवकर टळावे म्हणून ११ वेळा हनुमान चालीसाचे पठण केले

नवी दिल्ली - महाराष्ट्रावरील (उध्दव ठाकरे सरकारचे) संकट लवकरात लवकर टळावे म्हणून आपण ११ वेळा हनुमान चालीसाचे पठण केले, अशा शब्दांत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारमधील भूकंपावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. ठाकरे सरकार आपल्या कर्मानेच जाईल असेही त्या म्हणाल्या.

राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिल्या प्रकरणी तुरूंगवास झाला होता. त्यानंतर त्यांनी राज्य सरकार विशेषत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरूध्द आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या घटनाक्रम याबाबत त्यांनी संसदीय समितीसमोर ही बाजू मांडली होती. आपल्याला तुरंगात चांगली वागणूक मिळाली नाही अशी तक्रार त्यांनी संसदीय समितीसमोरही केली होती.

ताज्या घटनेबाबत राणा यांनी सांगितले की महाराष्ट्रावरील संकट टळावे यासाठी आपण ११ वेळा हनुमान चालीसा पठण केले. मला संकटमोचक हनुमानाकडूनच अपेक्षा आहेत. राज्यातील सरकार आपल्या कर्मानेच जाईल असे सांगून त्या म्हणाल्या की गेल्या अडीच वर्षांपासून आपण महाराष्ट्राला बुडताना पहात आहोत. राज्याचे नुकसान होत जाताना आमदार यापुढे अधिक काळ सहन करू शकत नाही. त्यामुळे महाराष्टावरील संकट लवकर संपायला हवे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांमुळेच सध्याचे संकट निर्माण झाले असल्याचेही राणा यांनी सांगितले.