
नक्वी, आरसीपी सिंह यांचे मंत्रिपदांचे राजीनामे
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील मुख्तार अब्बास नक्वी व रामचंद्र प्रसाद उर्फ आरसीपी सिंह यांनी आज केंद्रीय मंत्रिपदांचे राजीनामे दिले. दोघांचेही राज्यसबा कालावधी उद्या (ता. ७) संपत आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दोघांच्याही, विशेषतः नक्वी यांच्या कामाबद्दल प्रशंसोत्गार काढले. यामुळे नक्वी यांना भाजप उपराष्ट्पतीपदी संधी देणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली. ‘सकाळ' ने याबाबतची शक्यता वर्तविणारे वृत्त याआधीच दिले आहे. शिया मुस्लिम असलेले नक्वी मंत्रिमंडळातून बाहेर गेल्याने अटलबिहारी वाजपेयी व मोदी या दोन्ही सरकारांना सांधणारा अखेरचा दुवा आता सरकारच्या पातळीवरील सक्रिय राजकारणात नसेल.
दरम्यान नक्वी यांनीमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचीही आज भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद उद्गार काढल्याच्या प्रकरणाचे जागतिक पातळीवर, इस्लामी देशांत अत्यंत तीव्र पडसाद उमटल्याने मोदी सरकार ‘आपत्ती निवारण' म्हणून उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी असलेले घटनेतील दुसऱया क्रमांकाचे सर्वोच्च पद मुस्लिम समाजाला देणार अशी चर्चा आहे. यासाठी नक्वी यांच्या पूर्वसुरी नजमा हेप्तुल्ला, केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आदींचीही नावे चर्चेत असली व मोदींच्या धक्कातंत्राचा अविष्कार दिसला नाही तरी ते व गृहमंत्री अमित शहा यांनी अप्लसंख्यांक कार्ड खेळण्याचा निर्णय अंमलात आणला तर नक्वींची दावेदारी सध्या तरी सर्वांत प्रबळ आहे. मुख्य म्हणजे मोदी मंत्रिमंडळातीलच नव्हे तर संपूर्ण संसदेतील ते भाजपमधील एकमेव अल्पसंख्यांक-मुस्लिम चेहरा होते व आहेत त्यांना उपराष्ट्रपती करून पंतप्रधान मोदी मुस्लिम जगताला ‘मेसेज' देऊ शकतात व येमेन, ओमानसह १७ नाराज मुस्लिम देशांतील सरकारांवरील भारतविरोधी कथीत धार्मिक दबावाची धग कमी करू शकतात.
नक्वी यांचे राज्यसभेतील व मंत्री म्हणून योगदान स्मरणीय असेल व त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याची बावना मोदी यांनी निरोपाच्या भाषणात व्यक्त केली. राज्यसभा व लोकसभा पोटनिवडणूक या दोन्हींतूनही तिकीट न मिलाल्यावरही नक्वी आजही पूर्वीइतकेच प्रसन्न दिसतात व भाजपचा किल्ला लढवतात त्यावरून त्यांचे ‘सन्मानपूर्वक' पुनर्वसन मोदी करतील अशी शक्यता वर्तविली जाते.
दरम्यान आरसीपीसिंह यांची संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांच्याशी कुरबूर सुरू आहे. त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा जदयूकडून पाठविण्यात आला नव्हता. त्यांना मंत्री केल्यावरही नितीशकुमार पारसे खूष नव्हते असे सांगितले जाते. भाजपच्या हैदराबादेतील राष्ट्रीय कार्यकारिणीला हजेरी लावून सिंह यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजप मजबूत स्थितीत आहे. या निवडणुकीची अधिसूचना कालच जारी झाली व आज नक्वींचा राजीनामा आला हीदेखील सूचक बाब मानली जाते. ६ आॅगस्ट रोजी होणाऱया या निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख १९ जुलै आहे. २० जुलै रोजी अर्जांची छाननी व २२ जुलै ही अर्जमाघारीची अखेरची तारीख असेल. राष्ट्रपतीपदसाठीचे मतदान १८ जुलै रोजी आहे त्याच्या आसपास भाजप उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
Web Title: Mukhtar Abbas Naqvi And Ramchandra Prasad Rcp Singh In Narendra Modi Cabinet Resigned Union Ministers Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..