esakal | मुकुल रॉय यांचा भाजपला 'रामराम'
sakal

बोलून बातमी शोधा

मुकुल रॉय यांचा भाजपला 'रामराम'

मुकुल रॉय यांचा भाजपला 'रामराम'

sakal_logo
By
सागर शेलार

कोलकता ः पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील बाजी हरल्यानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विश्‍वासू समजले जाणारे मुकुल रॉय यांनी भाजपला जवळ केले होते. मात्र आता त्यांनी घरवापसी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर रॉय यांनी शुक्रवारी दुपारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

निवडणुकीपूर्वी ‘तृणमूल’मधून भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्‍यांची रांग लागल्याचे चित्र होते. त्यात मुकुल रॉय अग्रणी होते. बॅनर्जी यांच्या सर्वांत जवळचे समजल्या जाणाऱ्या रॉय यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. रॉय हे त्यांचा मुलगा सुभ्रांशुसह आज दुपारी तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात पोचले. तेथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर साडेतीनच्या सुमारास त्यांनी ‘तृणमूल’चे सदस्यत्व स्वीकारले. त्यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपासून आहे. त्यात रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा येणार असा अंदाज वर्तविण्यात येत होता, तो आज खरा ठरला. ‘तृणमूल’ची साथ सोडलेले आणखी एक दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी यांचे वजन भाजपमध्ये वाढत असून त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यात आले आहे. यामुळे मुकुल रॉय अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी पुन्हा ‘तृणमूल’ला जवळ केले, असे मानले जात आहे. पक्षाचे नेते सौगत रॉय यांनीही यासंदर्भात सूतोवच केले होते. ‘‘असे अनेक नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या संपर्कात असून ‘तृणमूल’मध्ये परतण्याची त्यांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेल्यानंतर जे परतू इच्छित आहेत त्यांची दोन गटात विभागणी केली जाऊ शकते. यातील एक सॉफ्टलायनर म्हणजे ज्यांनी पक्ष सोडला पण ममता बॅनर्जी यांचा अपमान कधीही केला नाही, असा एक गट असेल. ज्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सार्वजनिक टीका केली ते हार्डलायनर समजले जातील,’’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर वैयक्तिक आरोप कधीही केले नाहीत. त्यामुळे त्यांना ‘सॉफ्टलायनर’ मानले जात आहे.

भाजपमध्ये शोषण केले जाते ः ममता

रॉय यांच्या ‘घरवापसी’नंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘‘भाजपमध्ये खूप शोषण केले जाते. तेथे राहणे लोकांना कठीण आहे. भाजप सामान्यांचा पक्ष नाही. मुकुल हे घरातीलच एक असून ते परत आले आहेत. त्याच्याबरोबर माझे कोणतेही मतभेद नाहीत.’’ ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षात घेतले जाणार नाही. अन्य लोक पुन्हा पक्षात येऊ शकतात

भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये आलो आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्यात कोणी भाजपमध्ये राहणार नाही.

-मुकुल रॉय, तृणमूल काँग्रेस