पोर्नोग्राफीला वेसण घाला : नायडू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सोशल मीडिया व इतरत्र फैलावणाऱ्या पोर्नोग्राफी म्हणजेच अश्‍लील साहित्याला वेसण घालण्यासाठी जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने गंभीरपणे विचार करावा, अशी सूचना राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज केली.

नवी दिल्ली - सोशल मीडिया व इतरत्र फैलावणाऱ्या पोर्नोग्राफी म्हणजेच अश्‍लील साहित्याला वेसण घालण्यासाठी जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने गंभीरपणे विचार करावा, अशी सूचना राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज केली. महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी याबाबत आलेल्या तक्रारींवर गंभीर कारवाई केली जात असल्याचे सांगितले. आज कामकाज सुरू असताना नायडू यांनी, राज्यसभेत सदस्यांनी आपल्या मातृभाषेतून बोलावे असाही आग्रह धरला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

तमिळनाडूच्या विजीला सत्यनाथ यांनी पोर्नोग्राफीचा मुद्दा मांडताना, हे व्यसन तरुणांमध्ये वाढत चालल्याने याचा भावी पिढीवर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे सांगताच नायडू यांनी राज्यसभा समितीला याबाबत तातडीने ठोस व सकारात्मक उपाययोजना सुचवाव्यात अशी सूचना केली. ते म्हणाले, की याबाबत रमेश यांच्या समितीने उपाययोजना सुचवाव्यात. त्यांचे तातडीने व काटेकोर पालन करण्याच्या सूचना मी सरकारला देईन. या समितीने ज्येष्ठ सदस्य सुखेंदूशेखर रॉय (तृणमूल काँग्रेस), थिरूची सिवा (द्रमुक) व विनय सहस्त्रबुध्दे (भाजप) यांचाही समावेश करावा, असेही नायडू म्हणाले. पोर्नोग्राफीचे प्रमाण तरुण पिढीत वाढत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करताना नायडू म्हणाले की, पोर्नोग्राफी पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढत जाणे ही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे यावर तातडीने ठोस व लवकरात लवकर काही उपाययोजना होणे गरजेचे आहे. या उपाययोजना सरकारच्याच पातळीवर शक्‍य आहेत. त्यासाठी राज्यसभा सरकारला मदतीचा हात देईल. या वेळी सभागृहातच उपस्थित असलेल्या इराणी यांनी, पोर्नोग्राफीबाबत तक्रारी येताच आपले मंत्रालय तातडीने कारवाई करत असल्याचे सांगितले.

मातृभाषेतच बोला !
राज्यसभा हे राज्यांचे व्यासपीठ असल्याने या वरिष्ठ सभागृहात विविध भारतीय भाषांचे ध्वनी घुमले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना, सदस्यांनी आपल्या मातृभाषेतच विचार मांडावेत, असे नायडू यांनी सुचविले. राज्यसभेत तमिळ भाषेतून केलेल्या हिंदी भाषांतराचा दर्जा ऐकून नायडू यांनी समाधान व्यक्त केले. राज्यसभा सचिवालयाने मराठीसह भारतीय भाषांतून तत्काळ भाषांतराची (इन्टरप्रिटेशन) यंत्रणा विकसित केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naidu suggests committee be formed to check pornography