
Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ महाराष्ट्रभर काढणार : नाना पटोले
जलंब : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. याचा परिणाम कायम ठेवण्यासाठी राज्यातील सर्व महसुली विभागांमध्ये यात्रा काढल्या जातील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली. ते म्हणाले,‘‘यात्रेचा रविवारी (ता.२०) महाराष्ट्रातील अखेरचा दिवस आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्य प्रदेशातून यात्रेला पुन्हा प्रारंभ होईल. यात्रेची घोषणा झाली तेव्हा सर्वांनी काँग्रेसला मूर्खात काढले होते. जनता प्रतिसाद देणार नाही असे दावे केले होते. मात्र, शेगाव येथील सभेस अभूतपूर्व गर्दी उसळल्याने विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत.
काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस समितीच्या वतीने यात्रा काढल्या जातील. यादरम्यान होणाऱ्या सभांना सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी येतील.’’ यावेळी जयराम रमेश, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
भारत जोडो यात्रेत काँग्रेस फुटणार, पटोले तोंडघशी पडणार असे भाजपचे नेते म्हणत होते. मला बालिश ठरवले होते. आता कोण बालिश आहे, हे सर्वांना दिसले.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस