नेहरूंमुळेच गोवा दीर्घकाळ पारतंत्र्यात : पंतप्रधान मोदी | Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi
नेहरूंमुळेच गोवा दीर्घकाळ पारतंत्र्यात : पंतप्रधान मोदी | Narendra Modi

नेहरूंमुळेच गोवा दीर्घकाळ पारतंत्र्यात : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंडित नेहरूंना आपल्या आंतरराष्ट्रीय छबीची इतकी चिंता होती की त्यांनी ती जपण्यासाठी गोव्यात सैन्य पाठविले नाही. नेहरूंच्या या वागण्याने स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे गोवा पारतंत्र्यातच राहिला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. काँग्रेसवर शहरी नक्षलवाद्यांनी कब्जा केल्याने देशाला धोका निर्माण झाल्याचाही आरोप त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना केला.

मोदींची धारदार टीका सुरू होताच अस्वस्थ होऊन काँग्रेसने सभात्याग केला. ‘यूपीए’चे घटकपक्ष त्यात सामील झाले नाहीत. पंतप्रधानांनी राज्यसभेत सकाळी ११.३४ ते दुपारी १२.५६ वाजेपर्यंत भाषण केले. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या गोव्याचेही उदाहरण त्यांनी दिले. ‘‘स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी अवलंबलेल्या धोरणामुळेच गोवा दीर्घकाळ गुलामीत राहिला. सत्याग्रही जेव्हा गोळ्या झेलत होते तेव्हा, नेहरूंनी १५ ऑगस्ट १९५५ रोजी लाल किल्ल्यावरून गोव्यात सैन्य पाठवणार नाही असे सांगताना जे लोक तेथे जात आहेत त्यांना ते लखलाभ (मुबारक) होवो, अशी अत्यंत अहंकारी भाषा वापरली,’’ असे मोदी म्हणाले.

हेही वाचा: श्रीलंकेच्या 'आधार कार्ड'साठी भारत करणार मदत; अनुदानाला मंजुरी

काँग्रेस पक्ष राहिला तर काय काय होईल, हे गांधीजींना माहिती होते म्हणूनच ते काँग्रेसचे विसर्जित करू इच्छित होते, असे सांगून मोदी म्हणाले, ‘‘कोरोनाकाळात सर्वपक्षीय बैठकीवर या पक्षाने बहिष्कार टाकलाच पण इतर पक्षांनाही रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र शरदरावांनी (शरद पवार) त्याला नकार दिला. जरा त्यांच्याकडून तरी काही शिका.’’

कोरोना काळात आंतरराष्ट्रीय संस्थांची भारतीय अर्थव्यस्थेबाबतची सकारात्मक आकडेवारी व जागतिक पातळीवरील चित्र यांचे उदाहरण महागाई व बेरोजगारीवरून झालेल्या टीकेवर मोदींनी दिले. ‘‘उच्च विकास व मध्यम महागाई हा भारताचा प्रवास असून जगात अनेक देशांत याच्या उलट होत आहे. अमेरिका, ब्रिटनही महागाईच्या ऐतिहासिक स्फोटापासून वाचले नाहीत. तेव्हा भारताचा महागाई दर पाच टक्क्यांच्या आत राहिलेला आहे. कोरोनाचा संसर्ग जोपर्यंत आहे, तोवर सरकार गरीबांना मदत करत राहील,’’ असे मोदी म्हणाले.

हृदयनाथ मंगेशकरांचा ‘तो’ अपराध !

पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले, ‘‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने सारा देश दुःखात आहे. त्यांचे कुटुंब गोव्याचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही (घराण्याने) कशी वागणूक दिली गेली हे मी सांगतो. लताबाईंचे छोटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना केवळ आठ दिवसांत आकाशवाणीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यांचा अपराध काय होता ? तर त्यांनी सावरकरांची एक कविता स्वरबद्ध केली होती. (सागरा प्राण तळमळला ही ती कविता) सावरकरांनी त्यांना, तुला तुरूंगात जायचे आहे का, असा इशारा दिला होता. केवळ हृदयनाथच नव्हेत तर, मजरूह सुलतानपुरींनी नेहरूंवर टीका केली म्हणून त्यांना वर्षभर तुरुंगात डांबण्यात आले. प्रसिद्ध गायक किशोरकुमार यांना आणीबाणीत इंदिरा गांधींची बाजू न घेतल्याबद्दल त्रास दिला गेला.’’

काँग्रेस नसता तर..

महात्मा गांधींच्या स्वप्नानुसार काँग्रेस तेव्हाच बरखास्त व्हायला हवा होता, असे सांगून मोदींनी विरोधी पक्षनेते खर्गे यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले ...

काँग्रेस नसता तर -

- लोकशाही घराणेशाहीतून कधीच मुक्त झाली असती.

- भारताने विदेशी चष्म्याऐवजी स्वदेशी संकल्पांसह वाटचाल केली असती.

- आणीबाणीचा कलंक देशावर लागला नसता.

- जातीयवाद व प्रांतवादाची दरी इतकी खोल झाली नसती.

- शिखांचा नरसंहार झाला नसता व पंजाब वर्षानुवर्षे दहशतवादाच्या आगीत जळला नसता.

- काश्मिरी पंडितांवर राज्य सोडण्याची वेळ आली नसती.

मोदी म्हणाले ...

  • भारत १९४७ मध्येच अस्तित्वात आला अशा भ्रमात काही लोक आहेत. जेव्हा ३००-३५० वर्षांचा इतिहास उलगडेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येणारच. १८५७ च्या संग्रामात आदिवासींचे योगदान व अशा कित्येक गोष्टी सांगितल्याच जात नाहीत.

  • तोंडी तलाकची कुप्रथा आम्ही बंद केली. त्यामुळे केवळ मुलींनाच नव्हे तर, मुसलमान पुरुषांनाही न्याय मिळाला.

  • आंध्र प्रदेशाचे विभाजन करताना काँग्रेसच्या अहंकारामुळे माईक बंद केले गेले, मिरची स्प्रे उडविला गेला व आजही दोन्ही राज्यांतील कटुता कायम आहे.

  • एका घराण्याच्या विरुद्ध गेल्याने मुलायमसिंह यादव यांना अतोनात त्रास दिला गेला. टी. अंजय्या, देवीलाल, चरणसिंह, प्रकाशसिंग बादल, रामकृष्ण हेगडे, करुणानिधी अशा कित्येक मुख्यमंत्र्यांची सरकारे एका फटक्यात नष्ट केली गेली.

  • घराण्यावर टीका केली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली गेली.

Web Title: Narendra Modi Sansad Congress Pandit Nehru

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top