आजकाल विकासाचे राजकारण केले जात नाही - मोदी

- अवित बगळे
शनिवार, 28 जानेवारी 2017

पणजी - विकासाचे राजकारण आजकाल केले जात नाही हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे म्हणाले. भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पणजीतील कांपाल येथील मैदानावर ही सभा झाली.

पणजी - विकासाचे राजकारण आजकाल केले जात नाही हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे म्हणाले. भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पणजीतील कांपाल येथील मैदानावर ही सभा झाली.

पंतप्रधान म्हणाले, सार्वजनिक जीवनातील मूल्ये आज पायदळी तुडवली जात आहेत. राजकीय टीका होणार हे गृहित असते. मात्र विकासाच्या मुद्यावर चर्चाच करायची नाही. केवळ आरोप करत मतदारांची दिशाभूल करणे हे लोकशाहीच्या भल्यासाठी योग्य नव्हे. तरी देशातील लोक शहाणे आहेत. प्रत्येक ठिकाणाहून ते कॉंग्रेसला निरोप देत आहेत. त्याना केवळ राजकीय चिखलफेकीत रस आहे तर आम्हाला विकासात रस आहे. विकासाच्या मुद्यावर चर्चेची वेळ आली ते पळून जातात.

जगात भारताचा आता जयजयकार सुरु आहे. याचे कारण केंद्रात सक्षम आणि स्थिर सरकार आहे. अमेरिका, चीन, श्रीलंका, नेपाळ आणि जपानात भारताचा होत असलेला जयजयकार आणि त्यामुळे होणारा फायदा मी गोव्याच्या झोळीत टाकणार आहे, असे मोदी म्हणाले. 

या सभेला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री ऍड फ्रांसिस डिसोझा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते. सभेला उपस्थितांनी अधूनमधून मोदी मोदी अशा घोषणा देत वातावरण निर्मिती केली. मोदी यांच्या आगमनाला काही मिनिटे बाकी असताना संरक्षणमंत्र्यांनीही लोकांना आपल्यामागोमाग घोषणा देण्यास सांगितल्या होत्या. 

भारताने सर्जिकल स्ट्राईक कसा केला याची चर्चा आजही केली जाते. मी म्हणतो, मी दिवसाढवळ्या पाकिस्तानात गेलो. तेव्हाही कसा गेलो हे समजले नव्हते मग रात्री केलेला सर्जिकल स्ट्राईक कसा समजणार, असे पंतप्रधान म्हणाले. 

Web Title: narendra modi speech in goa