‘पीएम’ कणांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Clean Air Program

‘पीएम’ कणांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी करणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात (एनसीएपी) समाविष्ट असलेल्या शहरांतील प्रदूषित पीएम सूक्ष्मकणांचे प्रमाण २०२६ पर्यंत ४० टक्के कमी करण्याचे नवीन उद्दिष्ट केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले आहे. यापूर्वी, २०२४ पर्यंत पीएम कण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

यापूर्वीच्या उद्दिष्टानुसार २०२४ पर्यंत पीएम पातळीत २० ते ३० टक्क्यांनी कपात करणे आवश्यक होते. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातील आतापर्यंतचे परिणाम चांगले आहेत. त्यामुळे, आता २०२६पर्यंत हवेतील पीएम सूक्ष्मकणांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी करण्याचे नवीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. या नवीन उद्दिष्टांनुसार शहरे कृती आराखडा तयार करत आहेत, असेही त्याने सांगितले.

पीएम२.५ सूक्ष्मकणांचा वार्षिक मानक ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतका आहे. श्वासातून शरीरात जाणारे हवेतील हे सूक्ष्मकण सामान्यत: अडीच मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षाही सूक्ष्म असतात. त्यांचा आरोग्याला मोठा धोका असतो. यापूर्वी २०११ ते २०१५ दरम्यान सलग पाच वर्षे १३२ शहरांना हवेच्या दर्जाचा निर्धारित राष्ट्रीय गुणवत्ता मानक गाठण्यात अपयश आले होते.

मुंबई, पुणे, नागपुरात सुधारणा

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातील १३२ शहरांपैकी ९५ शहरांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये पीएम१० कणांच्या प्रमाणात एकूणच सुधारणा झाली आहे. चेन्नई, मदुराई, नाशिकसह देशभरातील २२ शहरांनी हवेतील पीएम १० सूक्ष्मकणांच्या वार्षिक सरासरीच्या (६० मायक्रोगॅम प्रति घनमीटर) राष्ट्रीय मानकाची पूर्तता केली आहे. पुणे, दिल्ली, नोयडा, मुंबई, नागपूर, वाराणसी, जयपूर, जोधपूर, रांची आदी शहरांत २०१७ पासून पीएम १० मध्ये सुधारणा झाली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातील एकूण शहरे - १३२

‘पीएम१०’ कणांत सुधारणा झालेली शहरे - ९५