National Herald case : आम्ही मोदींना घाबरणार नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ‘ईडी’च्या कारवाईचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे लोकसभेमध्ये आज काहीही कामकाज होऊ शकले नाही. ‘ईडी’ची कारवाई हा भीती दाखविण्याचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही मोदींना घाबरणार नाही. काँग्रेसचे उद्याचे महागाई विरोधातील आंदोलन होईलच, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधींनी या निमित्ताने दिला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काल यंग इंडियन कंपनीचे कार्यालय सील केले होते. तसेच काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या निवासस्थानाभोवती पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यानंतर आज राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले.
या घटनाक्रमामुळे संसदेतील वातावरण तापले. लोकसभेत काँग्रेस खासदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रचंड गोंधळ होऊन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना काही वेळातच सभागृह तहकूब करावे लागले. त्यानंतरही सभागृह गोंधळ झाल्याने दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
राज्यसभेत मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची खडाजंगी झाली. संसद सुरू असताना ईडीचे बोलावणे येतेच कसे असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. राज्यसभेतील खासदार दिग्विजयसिंह यांनीही ‘ईडी’ने खर्गेंना बोलावल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे, राहुल गांधींनीही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर आज मतप्रदर्शन केले. हा केवळ भयभीत करण्याचा प्रयत्न आहे. यांना वाटते की थोडा दबाव आणला तर हे गप्प बसतील पण आम्ही घाबरणार नाही. आमचे काम आहे देशाचे, लोकशाहीचे सलोख्याचे रक्षण करणे आणि ते करत राहू. संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी काँग्रेसचे उद्याचे आंदोलन होईलच, ते थांबवून दाखवा, असे आव्हान दिले. काँग्रेस मुख्यालय व सोनिया गांधींच्या निवासस्थानाभोवती पोलिसांनी अडथळे उभारल्याकडे लक्ष वेधले असता, “सत्याभोवती अडथळे उभारले जाऊ शकत नाही", अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.
‘त्यांचाच गोंधळ कसा ?’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की संसदेत सध्या विचित्र चित्र दिसत आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालणे ही ज्यांची ‘जबाबदारी‘ आहे असे सत्तारूढ पक्षाचे नेते, सभागृहाचे नेते कामकाजात अडथळे आणत आहेत. कामकाज तहकूब होण्यात हे सत्तारुढ नेतेच सक्रिय भूमिका बजावत आहेत. आजच्या तहकुबीला पीयूष गोयल हेच कारणीभूत असल्याचे पी. चिदंबरम यांनी या वेळी सांगितले. आरोप प्रत्यारोपांच्या या मालिकेत भाजपने मात्र, तपास संस्थांच्या कारवाईत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, हाच दावा वारंवार केला. हे सारे ‘यांच्याच' काळात होत असेल असे सांगून पीयूष गोयल म्हणाले, की तपास संस्था आपले काम कायद्यानुसार करत आहेत. यांना त्याचा का त्रास होत आहे?
‘यंग इंडियन’चे कार्यालय ‘सील' झाले असेल तर तेथे काहीतरी संशयास्पद सापडले असणार, असे सांगून संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, की हे सारे याच लोकांनी केले आहे व आता चौकशी सुरू झाल्यावर तेच आरडाओरडा करत आहेत. या देशाची न्यायपालिका निष्पक्ष व सक्षम आहे. तुम्ही काही (गैर) केले नसेल तर न्यायालयाला सामोरे जाण्यास का घाबरता, असाही सवाल संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विचारला.
खर्गेंनाही ईडीचं `आवतण'
संसदेचे अधिवेशन सुरू असताना प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) संसद सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या चौकशीचा जोर लावल्याचे पडसाद उमटले. ‘मलाही ईडीने आज १२.३० वाजता बोलावले आहे. मी कायद्याचे पालन करणार आहे. या सरकारच्या दमनकारी धोरणाला आम्ही घाबरणार नाही,‘ असे सांगताना विपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, हम डरेंगे नही, हम फाईट करेंगे‘असे आवेशाने सांगितले.
कॉंग्रेसचे आज महागाईविरोधात आंदोलन
काँग्रेसने उद्या (ता. ५) महागाई विरोधातील आंदोलनामध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचीही घोषणा केली आहे. मात्र पोलिसांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणि जमावबंदी आदेशाचे कारण पुढे आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट लक्षात घेता दिल्लीत जमावबंदी आदेश लागू असून अन्यत्र कुठेही आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे काँग्रेसच्या उद्याच्या आंदोलनावरून पुन्हा एकदा दिल्लीतील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.