नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याशी जोडला गेलाय

लखनऊ मधील केसरबाग येथील हेराल्ड हाऊस साठ आणि सत्तरच्या दशकात भारतीय राजकारण आणि पत्रकारितेचं शक्तीस्थान ठरलं होतं
National Herald
National Herald E sakal

बुधवारी १ जूनला कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि कॉग्रेसचे नेते राहुल गांधींना ED ने समन्स बजावला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांना ही नोटीस बजावण्यात आली असून, सोनिया गांधींना ८ जूनपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे, वाचा सविस्तर

नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राची स्थापना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरुंनी केली होती. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL कंपनीची १९३७ साली स्थापना करण्यात आली होती. AJL कडून 'नॅशनल हेराल्ड' हे इंग्रजी वर्तमानपत्र, हिंदीमध्ये 'नवजीवन ' आणि उर्दुत 'कौमी आवाज' हे वर्तमानपत्र प्रकाशित केले जात होते. याच वर्तमानपत्रांच्या कंपनीची खरेदी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या मालकीच्या यूथ इंडिया लिमिटेड YIL ने खरेदी केली होती. या व्यवहारात मनीलॉंडरिंग झाल्याचा आरोप भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींनी केला होता.

९ सप्टेंबर १९३८ साली म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात हे वर्तमानपत्र सुर करण्यात आलं. ''स्वातंत्र्य धोक्यात आहे. संपूर्ण ताकदीनिशी त्याचं रक्षण करा ''' असं वर्तमानपत्राच्या मास्टड हेड खाली (घोषवाक्य) लिहीण्यात आलं होतं. १९३९ साली इंदिरा गांधी इग्लंडला ब्रेंटफॉर्ड येथे गेल्या होत्या. तिथे हे वाक्य एका ब्रिटीश सरकारच्या पोस्टरवर इंदीरा गांधींनी वाचलं होतं. यानंतर इंदिरा गांधींनी हे वाक्य वडील पंडित जवाहरलाल नेहरुंना पाठवलं होतं. ''स्वातंत्र्य धोक्यात आहे, संपूर्ण ताकदीनिशी तिचं रक्षण करा '' हे वाक्य इतकं आवडलं की ते आहे तसंच त्यांनी थेट आपल्या वर्तमानपत्राचं घोषवाक्य म्हणून वापरलं. स्वातंत्र्य चळवळ अधिक प्रखर करणे, तसंच स्वातंत्र्य संग्रामातील माहीती लोकांपर्यंत पोहोचवणं हे उद्दीष्ट पंडीत जवाहरलाल नेहरुंनी ठेवलं होतं. स्वातंत्र्यानंतर हे वर्तमानपत्र कॉग्रेसचे मुखपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. १९३८ साली जेव्हा या वर्तमानपत्राची सुरुवात झाली. त्यावेळी कॉग्रेसने विधानसभा निवडणुकांमध्ये ११ प्रातांपैकी ८ प्रातांमध्ये विजय मिळविला होता.

१९४२ मध्ये नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र पहिल्यांदा बंद पडलं होतं. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी एक म्हणजे १९४२ साली 'चले जाव' चळवळीमुळे अनेक कॉग्रेसचे नेते तुरुंगात होते. त्यामुळे वर्तमानपत्राच्या निर्मितीकडे दुर्लक्ष झाल होतं. तसंच वर्तमानपत्रावर कर्जाचा डोंगरही झाला होता. या सगळ्या परिस्थितीवर मात करत, नोव्हेंबर १९४५ साली पुन्हा नॅशनल हेराल्ड सुरू झालं होतं. त्यानंतर २००८ साली हे वर्तमानपत्र बंद पडलं. जेव्हा हे वर्तमानपत्र २००८ मध्ये बंद पडलं, तेव्हापासून मात्र कॉग्रेसचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. 2008 साली वर्तमानपत्र ९० कोटी रुपयांच्या कर्जासह बंद पडलं होतं. २००८ साली कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीच्या यूथ इंडिया कंपनीने नॅशनलहेराल्डचे हक्क विकत घेतले. मात्र नॅशनल हेराल्ड खरेदी करताना अगदी तुटपुंज्या रकमेत खरेदी करण्यात आलंय, नॅशनल हेराल्डच्या संपत्तीची किंमत २ हजार कोटी रुपये असताना, अगदी ५० लाखात खरेदी झाल्याने मनी लॉंडरिंगचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी केला होता.

वरिष्ठ पत्रकार दुर्गा दास यांनी लिहीलंय, चाळीसच्या दशकात पंडीत नेहरु आणि महात्मा गांधी यांचे कनिष्ठ पूत्र देवदास गांधी यांच्यात कटूता निर्माण झाली होती. देवदास गांधी हिंदुस्थान टाईम्सचे संपादक होते. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या छपाईसाठी लागणाऱ्या खर्चासाठी आर्थिक टंचाई असल्याने त्यांनी देवदास गांधींना विनंती केली होती. मात्र नॅशनल हेराल्डला ते प्रतिस्पर्धी दैनिक मानत असतं. १५ ऑगस्ट १९४५ साली जेव्हा हे वर्तमानपत्र पहिल्यांदा बंद पडलं होतं. तेव्हा नॅशनल हेराल्डच्या कर्मचाऱ्यांना हिंदुस्थान टाईम्सने नोकरी दिली होती.

लखनऊ मधील केसरबाग येथील हेराल्ड हाऊस साठ आणि सत्तरच्या दशकात भारतीय राजकारण आणि पत्रकारितेचं शक्तीस्थान ठरलं होतं. आपण सर्वांनी केवळ नॅशनल हेराल्ड बद्दल ऐकलंय. पण नॅशनल हेराल्ड या इंग्रजी वर्तमानपत्राबरोबरच नवजीवन हे हिंदी वर्तमानपत्र आणि उर्दुतील कौमी आवाज यांचीही आठवण करायला हवी. हेराल्ड हाऊसच्या वर्तमानपत्रांवर जरी कॉग्रेसच्या मुखपत्राचा ठपका बसला असला तरी या वर्तमानपत्रांनी आणीबाणीतही सरकारवर ताशेरे ओढले होते. उर्दुतील 'कौमी आवाज' आणि हिंदीतील 'नवजीवन' या वर्तमानपत्रांचा मोठा वाचकवर्ग होता. पण ८० दशकात मात्र वाचकसंख्या घटू लागली. देशात अनेक राज्यात कॉग्रेसटी सत्ता असल्याने खरतर हेराल्ड संस्थेची जमीन आणि मालमत्ता वाढत होती. मात्र त्याचा फायदा वर्तमानपत्राला आणि कर्मचाऱ्यांना मात्र मिळत नव्हता. १९९८ साली तर कर्मचाऱ्यांना हेराल्डची काही संपत्ती विकून त्यांचे थकीत पगार देण्यात आले होते. यानंतर हेराल्ड वर्कर्स नावाने या कर्मचाऱ्यांनी वर्तमानपत्र सुरु केलं होतं. पण ते काही दिवसातच बंद पडलं होतं.

भलेही असोसिएटेड जर्नल्सची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरुंनी केली होती. पण या कंपनीचे ५ हजार स्वातंत्र्यसेनानी भागीदार होते. ९० च्या दशकात नॅशनल हेराल्ड तोट्यात जाऊ लागलं आणि २००८ मध्ये ते बंदच पडलं. त्यानंतर AJL नं वर्तमानपत्रांचं प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही कंपनी प्रॉपर्टी बिझनेसमध्ये उतरली होती . २०१० मध्ये शेयर होल्डरची संख्या १ हजार ५७ चं उरली. २०१० मध्येच या कंपनीची मालकी YIL ला विकण्यात आली. यातील ७६ टक्के मालकी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची आहे. तर २४ टक्के मालकी मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीस यांच्याकडे होती. मात्र दोघांचही निधन झालंय. मात्र जेव्हा AJL विकण्यात आली. तेव्हा इतर शेयर होल्डर समोर आले त्यांनी आपल्याला AJL ची मालकी ट्रान्सफर करताना कुठलीही नोटीस दिली नसल्याचा आरोप केला होता. यात माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू तसेच माजी मंत्री शांती भूषण यांनी आरोप केले होते, या दोघांच्याही वडीलांचे शेयर्स AJL मध्ये होते.

जानेवारी 2018 ला तिन्ही वर्तमानपत्र पुन्हा सुरु करण्याचा निर्णय AJL ने घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com