मोदींकडून आंध्रचा अपमान : चंद्राबाबू नायडू 

आर. एच. विद्या 
शनिवार, 17 मार्च 2018

आंध्र प्रदेशमधील प्रकल्पांसाठी मोदींनी कोणतेही सहकार्य केलेले नाही. मोदी सरकारच्या धोरणांमुळे आंध्रचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणी मोदी सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. 
- चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री 

अमरावती/हैदराबाद : विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अहंकारी वर्तनाने आंध्र प्रदेशचा अपमान केला आहे, असा घणाघाती हल्ला चढविताना तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडलो असल्याचे आज स्पष्ट केले. 

विधानसभेत बोलताना नायडू म्हणाले, की एनडीएशी संबंध तोडल्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक फायदे किंवा मंत्रालयांसाठी तेलुगू देसम पक्ष मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झाला नव्हता. अनेक दिवसांपासून पक्षाचे खासदार आंदोलन करत असतानाही मोदींनी दुर्लक्ष केले. किमान आमच्या खासदारांना बोलावून चर्चा करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. थेट सांगायचे झाल्यास, मोदींनी अहंकारी वर्तनाने आंध्रचा अपमान केला आहे. 

विभाजनादरम्यान देण्यात आलेली सर्व आश्‍वासने केंद्र सरकार पूर्ण करेल, असे मोदींनी म्हटले होते. दहा वर्षे आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासनही मोदींनी दिले होते. काही दिवसांतच घूमजाव करत 14व्या वित्त आयोगाने कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देण्यास मनाई केल्याचे सांगू लागले आहेत. विशेष दर्जाऐवजी विशेष पॅकेज देऊन आंध्रचा विकास करू अशा प्रकारची वक्तव्ये करत मोदी आंध्रवर अन्याय करू लागले आहेत, अशी टीकाही नायडूंनी केली. 

आंध्र प्रदेशमधील प्रकल्पांसाठी मोदींनी कोणतेही सहकार्य केलेले नाही. मोदी सरकारच्या धोरणांमुळे आंध्रचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणी मोदी सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. 
- चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री 

Web Title: National news Chandrababu Naidu criticize Narendra Modi on Andhra Pradesh special status